August 15, 2025 7:31 am

विदर्भ ही गुटख्याची राजधानी तर होत नाही ना..? – डॉ आयुश्री देशमुख

*  तिष्टी येथील कर्करोग निदान व उपचार शिबिरात 285 कर्करोग                   संशयितांची तपासणी
*  आमदार डॉ आशिष देशमुख यांचे कॅन्सरमुक्त अभियान

सावनेर/ कळमेश्वर: “तरुणांमध्ये तंबाखू, गुटखा, धूम्रपान याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आपल्या भागात सुद्धा ही परिस्थिती दिसून पडते. कर्करोगाच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. विदर्भ ही गुटख्याची राजधानी तर होत नाही ना. ?”, असा प्रश्न डॉ आयुश्री आशिष देशमुख यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तिष्टी येथे 21 मार्चला आयोजित कर्करोग निदान व उपचार शिबिरात उपस्थित केला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
                       त्या पुढे म्हणाल्या, “महिलांमधील कर्करोगावर आळा घालण्यासाठी कर्करोग प्रतिबंधात्मक एचपीव्ही लस प्रभावी ठरणार असून यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर आळा बसावा म्हणून माझी माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून 19 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी कर्करोग प्रतिबंधक एचपीव्ही लसीकरणाची नि:शुल्क सुविधादेखील आपण उपलब्ध करून दिली आहे. सोबतच मॅमोग्राफी व पॅप स्मिअर तपासणी तसेच सर्व तरुण व ज्येष्ठांची मुख कर्करोग तपासणी सुद्धा या शिबिरात करण्यात येत आहे. प्रारंभिक तपासणीत कर्करोगानी बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसत असून जनतेने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.”
                      कॅन्सरमुक्त अभियानांतर्गत आमदार डॉ आशिष देशमुख यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, तिष्टी येथे कर्करोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध विभागातील 285 कर्करोग संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील एकूण 110 रुग्णांना आणि कर्करोगाची स्पष्ट लक्षणे आढळलेल्या 35 रुग्णांना पुढील उपचारासाठी रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगणा रोड, नागपूर, लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (रुग्णालय) येथे रेफर करण्यात आले आहे. रणजीत देशमुख दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अभय कोलते यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.

                      शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, शासकीय दंत महाविद्यालय नागपूर, सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर, जिल्हा परिषद नागपूर (आरोग्य विभाग), नगर परिषद आरोग्य विभाग सावनेर, कळमेश्वर, रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगणा रोड, नागपूर, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर व कळमेश्वर तालुक्यात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. 17 फेब्रुवारी 2025 ते 19 एप्रिल 2025 पर्यंत चालणाऱ्या या अभियानाचे आयोजक सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉ आशिष देशमुख आहेत.
                      कर्करोग, स्त्रीरोग, शल्यचिकित्सा, कान/नाक/घसा, मेडिसिन, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग व दंतरोग विभागातील विशेषज्ञांनी या शिबिरात आपल्या सेवा प्रदान केल्या. यावेळी डॉ विल्किन्सन, डॉ यामिनी पुसदेकर, डॉ सुधीर रावलानी, डॉ संदीप खंडाईतकर तसेच रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर्स तसेच तिष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. पुढील कर्करोग निदान व उपचार शिबिर तसेच इतर सर्व प्रकारच्या रुग्णांचे तपासणी शिबीर 24 मार्चला प्राथमिक आरोग्य केंद्र केळवद येथे संपन्न होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News