August 15, 2025 7:58 am

शिवाजी बीएड काॅलेजचा दीक्षांत सोहळा‎

♦ विद्यार्थ्यांनी पदवीचा योग्य उपयोग करायला हवा, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. तुपे यांचे प्रतिपादन

अमरावती : सध्या स्थितीशीलता बदलून गतिशीलता आली. या गतिशीलतेच्या अनुषंगाने शिक्षकाने स्वतःमध्ये बदल घडवून आपल्या पदवीचे मोल जोपासणे गरजेचे आहे. पदवीसाठी जी तपश्चर्या केली ती केवळ रोजगार निर्मितीसाठी न करता सांस्कृतिक व ज्ञानाधिष्ठित मूल्य जोपासण्यासाठी करावी, असे प्रतिपादन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी केले.
                        ते स्थानिक श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयात (बीएड) आयोजित पदवी प्रमाणपत्र व पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य माजी प्राचार्य केशवराव गावंडे होते. प्राचार्य डॉ. विनय राऊत, विभाग प्रमुख डॉ. संजय खडसे, डॉ. अमित गावंडे, डॉ. किशोर क्षत्रिय, विद्यार्थी प्रतिनिधी सूरज मदनकर व साहिल राठोड उपस्थित होते.
                        डॉ. केशव तुपे म्हणाले, मानवाने उत्क्रांतीपासून आतापर्यंत जी प्रगती केली, ती बुद्धीच्या बळावर केली आहे. सध्या कळपाची मानसिकता वाढत चाललेली आहे. असेच चालत राहिले तर आपण खूप मागे जाऊ. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कळपाच्या भूमिकेपासून दूर राहून शिक्षकी पदवी मूल्यांच्या अनुषंगाने वाटचाल करावी. प्राचार्य केशवराव गावंडे म्हणाले की, माणूस हा आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्यार्थी असतो. शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ असतो. पदवी मिळाली म्हणून कुठलाही बडेजावपणा न करता विद्यार्थ्यांनी पदवीचा योग्य उपयोग करावा.
                         यावेळी बी.एड.परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बी.एड. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना पदवीसह विविध पारितोषिकांसह सन्मानित केले. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शिव्या मुक्त समाज अभियानच्या वतीने प्रा. डॉ. संजय खडसे यांनी शिव्यामुक्त समाज निर्मितीसाठीची शपथ दिली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विनय राऊत, सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय खडसे व प्रा. डॉ. किशोर क्षत्रिय यांनी संयुक्तपणे केले तर आभार प्रा. डॉ. अंजली ठाकरे यांनी मानले.

रेश्मा सदार यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव रेश्मा केशवराव सदार या विद्यार्थिनीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय स्थान मिळवल्याबद्दल व महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिला स्व. अनुसयाबाई थोरात सुवर्णपदक, स्व. विठ्ठलराव गायगोले रौप्य पदक, स्व. मामासाहेब लोंढे यांच्यातर्फे स्व. कृष्णराव रोकडे स्मृतिप्रीत्यर्थ रौप्य पदक, स्व. वनमालाबाई कोहळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रौप्य पदक, स्व. चित्रा अशोकराव घोगरे स्मृतिप्रीत्यर्थ रौप्य पदक, स्व. विनायकराव उर्फ आप्पासाहेब ठाकरे स्मृतिप्रीत्यर्थ रौप्य पदक देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News