February 7, 2026 8:38 am

संपत्तीच्या वादातून लहान भावाची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात पेटवून पुरावे नष्ट

सख्खा भाऊच ठरला खुनी!

कळमेश्वर तालुक्यात खळबळ; आरोपीला अवघ्या चार तासांत अटक

का टा वृत्तसेवा : संजय गणोरकर

कळमेश्वर | प्रतिनिधी  : शेती, घर आणि पाण्याच्या वाटणीवरून पेटलेल्या कौटुंबिक वादाचा शेवट रक्तरंजित हत्याकांडात झाला. कळमेश्वर तालुक्यातील मोहगाव–सावंगी शिवारात थोरल्या भावानेच आपल्या सख्ख्या लहान भावाची निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्यात टाकून पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून कळमेश्वर पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला अटक करत गुन्ह्याचा छडा लावला.

शेतात काम करताना अचानक बेपत्ता

मृत अरुण रामाजी तुरारे (४३, रा. धनगरपुरा, मोहपा) हे शनिवारी (दि. १३) मोहगाव–सावंगी शिवारातील स्वतःच्या शेतात पत्नी जोस्ना यांच्यासह काम करत होते. दुपारी दोघांनी शेतातच जेवण केल्यानंतर जोस्ना कापूस वेचण्यासाठी शेजारच्या शेतात गेल्या. सायंकाळी परत आल्यावर शेतात ट्रॅक्टरचे रोटावेटर मशीन सुरू होते; मात्र अरुण कुठेच दिसून आले नाहीत. त्यांच्या चप्पल व दुपट्टा मशीनजवळच आढळून आल्याने संशय अधिकच बळावला.

आधी बिबट्याचा संशय, नंतर उघडकीस आला खून

परिसरात बिबट्याच्या हालचालींच्या चर्चेमुळे सुरुवातीला अरुणला बिबट्याने ओढून नेले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. वनविभागालाही याची माहिती देण्यात आली. मात्र रात्री ११ वाजताच्या सुमारास वनकर्मचाऱ्यांना शेतालगतच्या नाल्यात संशयास्पदरीत्या लाकडे पेटवून आग लावल्याचे दिसून आले. तपासात त्या ठिकाणी जळालेल्या मानवी हाडांचे अवशेष आढळले. यामुळे ही घटना अपघात नसून निर्घृण खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.

सख्ख्या भावाची कबुली; तीन वर्षांपासून वाद

वनविभागाने तातडीने कळमेश्वर पोलिसांना कळविले. ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व फरिन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान मृतकाचा मोठा भाऊ चंद्रशेखर रामाजी तुरारे (५८, रा. मोहपा) याच्यावर संशयाची सुई फिरली. चौकशीत आरोपीने शेती, विहीर, पाणीवाटप, मोटर, पाइपलाइन आणि घराच्या हिस्सेवाटणीवरून सुरू असलेल्या वादातूनच अरुणची धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबुली दिली. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकून पेट्रोल टाकून जाळल्याचेही त्याने मान्य केले.

अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा उलगडा

फिर्यादी जोस्ना अरुण तुरारे यांच्या तोंडी तक्रारीवरून कळमेश्वर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला जेरबंद करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला.

परिसरात भीती व संतापाचे वातावरण

या थरारक हत्याकांडामुळे मोहगाव–सावंगी परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सख्ख्या भावानेच संपत्तीच्या लालसेपोटी भावाचा जीव घेतल्याने ‘नात्यांपेक्षा संपत्ती मोठी झाली का?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहेत.

0
1

Leave a Reply

Realted News