February 7, 2026 8:38 am

सत्तेचा अमरपट्टा कुणाकडेच नाही : राज ठाकरे

महाराष्ट्रातील बिनविरोध निवडींवर भाजपची दुटप्पी भूमिका – राज ठाकरेंचा घणाघात

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडींविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणारा भाजप, महाराष्ट्रात मात्र त्याच पद्धतीकडे डोळेझाक का करतो? असा थेट आणि जळजळीत सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी उद्याचा विचार करावा, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध झाला. ‘मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा’ या नावाने सादर झालेल्या या घोषणापत्राच्या वेळी राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या निवडणूक पद्धतीवर कठोर शब्दांत टीका केली.

पश्चिम बंगालमध्ये न्यायालय, महाराष्ट्रात मौन – भाजपची निवडक लोकशाही

राज ठाकरे म्हणाले,
“पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिनविरोध निवडी झाल्या, तेव्हा भाजपला लोकशाही आठवली आणि थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मग आज महाराष्ट्रात काय चाललंय? इथे बिनविरोध निवडी चालतात का? लोकशाहीची तत्वं राज्य बदललं की बदलतात का?”

भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप करत ते पुढे म्हणाले,
“आज सत्तेत आहात म्हणून काँग्रेसने पूर्वी जे केलं तेच आम्ही करतो, असं म्हणणं म्हणजे आपल्या चुकीचं समर्थन आहे. उद्या सत्ता बदलेल, आणि तुम्ही घालून दिलेले हेच पायंडे दामदुपटीने तुमच्यावर वापरले गेले, तर तक्रार करण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही.”

महाराष्ट्राला यूपी–बिहार बनवण्याचा प्रयत्न?

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबाबत तीव्र चिंता व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की,
“महाराष्ट्राला हळूहळू यूपी–बिहारसारखं बनवलं जात आहे. निवडणुका, प्रशासन आणि राजकारणाची घसरण ही केवळ आजची समस्या नाही, तर पुढच्या पिढ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करणारी आहे. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीची विचारसरणीच बदलली जात असेल, तर तो महाराष्ट्रासाठी फार मोठा धोका आहे.”

फडणवीसांचे वक्तव्य म्हणजे विनोद

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार संबोधल्याच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली.
“मी फक्त हसलो… शांतपणे हसलो. संजय राऊत जोरात हसले. तेच त्याचं उत्तर आहे,” असे म्हणत त्यांनी या वक्तव्याची खिल्ली उडवली.

महाराष्ट्रात महापौर मराठीच

मराठी अस्मितेचा मुद्दा ठळकपणे मांडताना राज ठाकरे म्हणाले,
“हा महाराष्ट्र आहे. इथला प्रत्येक महापौर मराठीच होणार. इथे हिंदी–मराठीचा वाद कशासाठी? मराठीचा मान ठेवणं ही कोणतीही राजकीय तडजोड नाही, ती आपली ओळख आहे. मुंबईचा महापौर मराठीच असणार.”

सत्तेला खुले आव्हान

राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“राज्य किंवा केंद्र सरकारची परवानगी लागणाऱ्या बाबी वेगळ्या, पण आमच्या वचननाम्यातील चांगल्या कामांना जर विरोध केला गेला, तर तो विरोध महाराष्ट्राच्या विकासाविरुद्ध असेल.”

शिवसेना भवन आणि जुन्या आठवणी

शिवसेना भवनात २० वर्षांनंतर परत आल्याच्या भावना व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले,
“आज इथे आलो तेव्हा जेलमधून सुटलोय असं वाटलं. माझ्या मनात जुनं शिवसेना भवन कोरलेलं आहे. १९७७ साली जनता पक्षाच्या सरकारच्या काळात इथे दगडफेक झाली होती, त्या सगळ्या आठवणी आजही ताज्या आहेत.”

0
0

Leave a Reply

Realted News