क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
कारंजा घाडगे : काजळी जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा येथे स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका राई परतेती होत्या. त्यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाची माहिती देऊन विद्यार्थिनींनी शिक्षणाद्वारे स्वतःची प्रगती साधावी, असे आवाहन केले. याप्रसंगी सहाय्यक शिक्षक गौतम सुटे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सोसलेले कष्ट आणि त्यांचे सामाजिक योगदान आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळ व रोशन वरठी यांची उपस्थिती होती. त्यांनी शाळा आणि गाव यांच्यातील समन्वयावर भर देत सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच अंगणवाडी सेविका शुभांगी फरकडे यांनीही आपले विचार मांडून बालसंस्कारांमध्ये शिक्षिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, इतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षक वृंदातर्फे करण्यात आले उपस्थित सर्व विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.









