सर्वधर्मीय उत्सवांतील ध्वनीप्रदूषणाला आळा घाला : महाराष्ट्र अंनिसची मागणी

सर्वधर्मीय उत्सवांतील ध्वनीप्रदूषणाला आळा घाला : महाराष्ट्र अंनिसची मागणी

कायदा सर्वांसाठी समान असावा; डीजे, डॉल्बी, लाऊडस्पीकरच्या ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

नागपूर : उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि सार्वजनिक समारंभ हे समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. प्रत्येक नागरिकाला आपला धर्म, श्रद्धा आणि परंपरा पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, या स्वातंत्र्यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्य, शांतता आणि जगण्याच्या अधिकारावर अतिक्रमण होता कामा नये. त्यामुळे सर्व धर्मीय सण-उत्सव, मिरवणुका, धार्मिक स्थळे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी कायद्याची समान, पारदर्शक आणि कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महाराष्ट्र अंनिस) केली आहे.

भारतामध्ये Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 लागू आहेत. या नियमांनुसार निवासी क्षेत्रासाठी दिवसा, म्हणजे सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ध्वनीची मर्यादा ५५ डेसिबल, तर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ४५ डेसिबल निश्चित करण्यात आली आहे. शांतता क्षेत्रासाठी ही मर्यादा अनुक्रमे ५० आणि ४० डेसिबल आहे. लाऊडस्पीकर किंवा सार्वजनिक ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असून रात्रीच्या वेळेत त्याच्या वापरावर स्पष्ट निर्बंध आहेत.

‘डॉल्बी’ किंवा ‘डीजे’च्या नावाखाली नियमांना बगल नको

विशेषतः ‘डॉल्बी’, मोठ्या क्षमतेच्या साउंड सिस्टीम किंवा डीजेच्या नावाखाली कायदेशीर ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक आवाजात ध्वनीप्रक्षेपण करण्यास कोणतीही मुभा नाही. एखाद्या यंत्रणेचे नाव ‘डॉल्बी’ किंवा ‘डीजे’ आहे की नाही, हा मुद्दा नसून त्या यंत्रणेतून निर्माण होणारा आवाज कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेत आहे की नाही, हा महत्त्वाचा निकष आहे.

सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वापरण्यासाठी लेखी परवानगी आवश्यक असल्याचे मुंबई उच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे.

पर्यावरणपूरक उत्सवाबरोबर संवेदनशील उत्सवाची गरज

महाराष्ट्र अंनिसने गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपती आणि पर्यावरणपूरक दिवाळी यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सण साजरे करण्याची संस्कृती अधिक संवेदनशील, विवेकी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी जनजागृती केली आहे.

पर्यावरणपूरक सण म्हणजे केवळ प्रदूषण कमी करणे नव्हे, तर मानवी आरोग्य, प्राणी-पक्षी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्ती यांचा विचार करून उत्सव साजरा करणे होय.

ध्वनीप्रदूषण हा सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न

ध्वनीप्रदूषण हा पर्यावरणीय तसेच सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्र अंनिसची भूमिका कोणत्याही एका धर्माच्या किंवा विशिष्ट उत्सवाच्या विरोधात नाही. गणेशोत्सव असो, नवरात्र असो, ईद असो, मोहरम असो, ख्रिसमस असो, गुरुपर्व असो किंवा अन्य कोणताही धार्मिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रम असो—कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, अशी भूमिका समितीने स्पष्ट केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयानेही ध्वनीप्रदूषणासंदर्भातील निर्देश सर्व धर्म आणि सर्व पंथांच्या सण-समारंभांना लागू असल्याचे स्पष्ट केले आहे.

तक्रारीनंतर तातडीने ध्वनीपातळी मोजण्याची मागणी

नियमांचे उल्लंघन झाल्यास नागरिकांच्या तक्रारींवर पोलिस आणि संबंधित प्रशासनाने त्वरित घटनास्थळी पोहोचून ध्वनीची पातळी मोजावी तसेच बेकायदेशीर ध्वनिवर्धक तत्काळ बंद करावेत. न्यायालयीन निर्देशांमध्येही नागरिकांच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करण्यासोबतच ध्वनीपातळीची नोंद करण्यावर भर देण्यात आला आहे.

महाराष्ट्र अंनिसच्या प्रमुख मागण्या

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत—
▪️ सर्व धर्मीय सण-उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये Noise Pollution Rules, 2000 ची काटेकोर अंमलबजावणी करावी.
▪️ लाऊडस्पीकर, डीजे, डॉल्बी किंवा अन्य ध्वनिवर्धक यंत्रणांना पूर्वपरवानगी घेणे आणि निर्धारित डेसिबल मर्यादेचे पालन करणे अनिवार्य करावे.
▪️ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळे, आयोजक, ध्वनियंत्रणा चालक आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी.
▪️ नागरिकांच्या तक्रारींवर पोलिस व संबंधित प्रशासनाने त्वरित घटनास्थळी जाऊन ध्वनीची पातळी मोजावी.
▪️ निर्धारित मर्यादेचे उल्लंघन करणारे बेकायदेशीर ध्वनिवर्धक तत्काळ बंद करावेत.

ही भूमिका महाराष्ट्र अंनिसच्या वतीने डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, राहुल थोरात, सम्राट हटकर, मधुकर गायकवाड, प्रवीण देशमुख, अण्णा कडलसकर, रामभाऊ डोंगरे, मुक्ता दाभोलकर आणि नीता सामंत यांनी मांडली.

अशी मागणी प्रा. प्रवीण देशमुख, राज्य कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.


 

 

0
0

Leave a Reply

Realted News