सावनेरमध्ये काँग्रेसला धक्का; भाजपचा दणदणीत विजय
आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास
सावनेर : नगर परिषद निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर झाला असून नागपूर जिल्ह्यातील सावनेर–कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. विकासकामांच्या जोरावर आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या नेतृत्वाला मतदारांनी मोठा कौल दिला असून सावनेर, कळमेश्वर आणि खापा या तिन्ही ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली आहे.
विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सावनेरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सावनेर येथे काँग्रेसचे सर्व उमेदवार पराभूत झाले असून भाजपच्या संजना मंगळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. सावनेर नगर परिषदेत २३ पैकी २१ नगरसेवक भाजपचे, तर २ नगरसेवक स्थानिक आघाडीचे निवडून आले आहेत. या निकालामुळे सावनेर काँग्रेसमुक्त झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कळमेश्वर नगर परिषदेत भाजपचे अविनाश माकोडे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. येथे भाजपचे १५ तर काँग्रेसचे ६ नगरसेवक निवडून आले. खापा नगर परिषदेतही भाजपने विजय मिळवला असून पियुष बुरडे हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. कळमेश्वर आणि खापा या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.
या निकालानंतर आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी सर्व विजयी नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन केले असून मतदारांनी विकासाच्या कामांवर विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. या विजयामुळे सावनेर–कळमेश्वर–खापा परिसरात भाजपचे राजकीय वर्चस्व अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
![]()
![]()