स्तन कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे महिलांनी नियमित तपासणी करून घेणे आवश्यक : आमदार डॉ आशिष देशमुख

मोहपा येथील कर्करोग निदान व उपचार शिबिरात 525 कर्करोग संशयितांची तपासणी.
आमदार डॉ आशिष देशमुख यांचे कॅन्सरमुक्त अभियान.

मोहपा : “तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारा कॅन्सर हा जीवघेणा आजार असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, ही बाब सर्वांना माहीत असून सुद्धा आजची तरुण पिढी याबाबत गंभीर दिसत नाही. ग्रामीण भागात सुद्धा कॅन्सरने मोठ्या प्रमाणात पाय पसरले असून यावर आळा घालण्याची नितांत गरज आहे. गुटखा, सुपारीच्या सेवनामुळे तोंड न उघडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली आहे. ही पूर्व-कर्करोगाची लक्षणे असून यावर वेळीच उपचार न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. स्तन कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे महिलांनी आपली नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे”, असे आवाहन आमदार डॉ आशिष देशमुख यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मोहपा येथे आयोजित कर्करोग निदान व उपचार शिबिरात केले.
                    आमदार डॉ आशिष देशमुख आयोजित कॅन्सरमुक्त अभियानांतर्गत मोहपा येथील शिबिरात विविध विभागातील 525 रुग्णांची तपासणी करण्यात आली. कर्करोगाची स्पष्ट लक्षणे आढळलेल्या 121 रुग्णांना पुढील उपचारासाठी रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगणा रोड, नागपूर, लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (रुग्णालय) येथे रेफर करण्यात आले आहे.
                    डॉ. आयुश्री आशिष देशमुख यांनी यावेळी महिलांमधील कर्करोगाबद्दल सुद्धा जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले. रणजीत देशमुख दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अभय कोलते यांनी यावेळी कॅन्सरमुक्त अभियानाची माहिती दिली. लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूरच्या कर्करोग, स्त्रीरोग, शल्यचिकित्सा, कान/नाक/घसा, मेडिसिन, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग व दंतरोग विभागातील विशेषज्ञांनी या शिबिरात आपल्या सेवा प्रदान केल्या. कर्करोगाशिवाय इतर आजाराच्या रुग्णांची सुद्धा तज्ञांनी तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरात परिसरातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.
                         यावेळी मनोहर कुंभारे, कळमेश्वरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिपाली कुलकर्णी, प्राथमिक आरोग्य केंद्र मोहपाचे आरोग्य अधिकारी, रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर्स तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

                         पुढील कर्करोग निदान व उपचार शिबिर तसेच इतर सर्व प्रकारच्या रुग्णांचे तपासणी शिबीर 11 एप्रिलला प्राथमिक आरोग्य केंद्र चिचोली येथे संपन्न होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News