September 8, 2025 7:51 pm

चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत ‘मतचोरी’!

चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत ‘मतचोरी’!

तक्रारीनंतरही निवडणूक आयोगाकडून कारवाई नाही, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धोटे व खासदार धानोरकर यांचा आरोप..

काटा वृत्तसेवा I चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाली. काँग्रेसच्या तक्रारीनंतर सहा हजार ८५३ बोगस मतदारांची नावे वगळण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य आरोपीपर्यंत पोलीस अद्याप पोहचले नाहीत. निवडणूक आयोग तथा जिल्हाधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्यापलीकडे अद्याप कुठलीही कारवाई केली नाही.
                         भाजपचे आमदार देवराव भोंगळे चोरीच्या मतांवरच विजयी झाले. वरोरा विधानसभा तसेच जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रपरिषदेत केला.
                         काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सबळ पुराव्यानिशी मतांची चोरी उघड केली आहे. अशाच प्रकारची मतचोरी चंद्रपूर जिल्ह्यातही झाली आहे. राजुरा येथील प्रकरण तर मतचोरीचा सबळ पुरावा आहे. येथे असंख्य फोनवरून मतांची नोंदणी झाली होती. त्यानंतर सहा हजार ८५३ बोगस मतदारांची नावे वगळण्याची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी राजुरा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला, मात्र कारवाई शून्य आहे.
                          जिल्हाधिकार्यांना कारवाईसंदर्भात विचारले तर निवडणूक आयोगाकडे बोट दाखवतात, असे सांगतानाच, केवळ राजुराच नाही तर वरोरा मतदारसंघ तसेच जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत मतचोरी झाल्याचा दावा जिल्हाध्यक्ष धोटे व खासदार धानोरकर यांनी केला.

                           निवडणूक काळात भाजप उमेदवार तथा विद्यमान आमदार भोंगळे यांचे प्रचार साहित्य आणि रोख ६१ लाख रुपये मिळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला, मात्र कारवाई शून्यच. आता तर ‘एनसी मॅटर’ म्हणून फाईल बंद केली. मात्र, ६१ लाख रुपये आले कुठून हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पोलीस विभागाकडे पैसे पडून आहे. पोलीस विभाग यावर काहीही बोलायल तयार नाही, असा आरोपही धोटे यांनी केला.
                            यावेळी धोटे यांनी, लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद केल्याने गरजू लाडक्या बहिणी मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोप केला. तसेच राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने पीकविमा, शिवभोजन थाली तसेच अनेक लोकोपयोगी योजना बंद होत असल्याचे सांगितले.
                            पत्रपरिषदेला शहर अध्यक्ष रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, विनोद दत्तात्रेय, सुनंदा धोबे, सुनिता लोढीया, नंदू नागरकर, प्रवीण पडवेकर, राजेश अडूर, शिवा राव, उपस्थित होते.

‘वाळू माफिया’ मुळे अपघातात वाढ

                            जिल्ह्यात वाळू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील अपघात वाढले. राजुरा येथे अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी वाळू माफिया जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी धोटे व धानोरकर यांनी केली. रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्ष खासदार धानोरकर आहेत. यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी, आरटीओ अधिकारी यांच्याकडे यासंदर्भात सातत्याने तक्रारी केल्या, मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांचे कुणीच ऐकत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News