February 7, 2026 1:07 pm

पं. स.च्या सभापतिपदासाठी ६ रोजी आरक्षण सोडत

जि. प. सर्कल आरक्षणासाठी प्रतीक्षाच

का टा वृत्तसेवा I विजय नागपुरे
नागपूर : जिल्हा परिषद सर्कलच्या झिरो रोस्टरला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली असली, तरी अद्याप जि. प. सर्कलचे आरक्षण व महिला आरक्षणाची सोडत कधी होणार, हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी ६ ऑक्टोबर रोजी आरक्षण काढण्यात येणार आहे.
                         नागपूर जिल्हा परिषदेत १३ पंचायत समित्या आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, नामाप्र व महिलांकरिता सभापतिपदाचे आरक्षण काढायचे आहे. ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात सकाळी ११ वाजता ही आरक्षण सोडत होणार आहे. सभापतिपदाचे चित्र स्पष्ट होणार असल्यामुळे सभापतिपदावर डोळा ठेवून पंचायत समितीची निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.
                        जिल्हा परिषदेच्या ५७ सर्कलची रचना जाहीर झाली आहे. यावेळी आरक्षणासाठी झिरो रोस्टर लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आधी लागू असलेल्या आरक्षणाचा चक्रानुक्रम लागू न करता नव्याने २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण निश्चित केले जाईल. नागपूर जिल्हा परिषदेत ५७ पैकी २८ जागा मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत. यांपैकी १० जागा अनुसूचित जातीसाठी, ८ जागा अनुसूचित जमातीसाठी व १० जागा ओबीसींसाठी राखीव आहेत. या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत.

निवडणुकीत आरक्षण निश्चितीच्या सोडतीकडे नजरा

                      निवडणुकीत आरक्षण निश्चितीसाठी २०११ च्या लोकसंख्येचा आधार धरला जाणार आहे. झिरो रोस्टर झाल्यामुळे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार कोणते सर्कल आरक्षित होतील, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी निवडणूक शाखेशी संपर्क साधून याची माहिती करून घेतली आहे. आता फक्त महिला आरक्षणासाठी गाडी अडली आहे. एकदा सर्कलचे चित्र स्पष्ट झाले की प्रचाराचा मार्ग मोकळा होईल.
0
0

Leave a Reply

Realted News