गळके छत, ओल्या भिंती आणि सुविधांचा अभाव
मोहप्यातील ‘क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’कडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष?
१३ वर्षांपासून स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
४३ विद्यार्थी शासकीय सेवेत, तरीही जर्जर इमारतीत सुरू आहे अभ्यासीका
मोहपा | प्रतिनिधी : ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची दर्जेदार तयारी करता यावी, या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कल, मोहपाच्या अभ्यासीकेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गळके छत, ओल्या भिंती आणि मूलभूत भौतिक सुविधांचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, या प्रश्नाकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप संस्थेकडून करण्यात आला आहे.
सध्या ही अभ्यासीका नगर परिषद कन्या शाळा, मोहपा येथील इमारतीत कार्यरत आहे. मात्र, इमारत जीर्ण झाल्याने पावसाळ्यात छत गळते, भिंतींना ओल येते आणि अभ्यासासाठी प्रतिकूल वातावरण निर्माण होते. परिणामी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
स्टडी सर्कलमध्ये सध्या १६० वाचक-सदस्य असून, आजपर्यंत ४३ विद्यार्थ्यांची शासनाच्या विविध विभागांमध्ये निवड झाली आहे. याशिवाय, स्पर्धा परीक्षांसाठी अद्ययावत पुस्तके उपलब्ध करून देण्यासोबतच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नियमित मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेने दिली.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या समस्येबाबत नगर परिषद प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. मदतीची आश्वासने मिळाली; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत महाजन म्हणाले, “धार्मिक स्थळांसाठी निधी सहज उपलब्ध होतो; मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित वाचनालये आणि अभ्यासिकांसाठी आवश्यक निधी मिळविण्यास मोठा संघर्ष करावा लागतो. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”
या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांनी तातडीने लक्ष घालून अभ्यासीकेस आवश्यक दुरुस्ती व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी डॉ. प्रशांत महाजन यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित या प्रश्नाकडे संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने पाहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.











