पती, पत्नी आणि प्रियकर तिघेही एकत्र राहण्यास तयार
नणंद-सासऱ्यांचा विरोध, सीतापूर पोलिसांसमोर अजब कौटुंबिक पेच
सीतापूर : उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद कोतवाली पोलिस ठाण्यात आलेल्या एका कौटुंबिक वादाने पोलिसांनाही चक्रावून टाकले. पती-पत्नी आणि महिलेचा प्रियकर तिघेही एकत्र राहण्यास तयार असल्याचे सांगत असताना, संबंधित महिलेने दिवसा प्रियकरासोबत आणि रात्री पतीसोबत राहण्याचा चक्क ‘ड्युटी चार्ट’च पोलिसांसमोर ठेवला.
पती कामावर, मग प्रियकरासोबत वेळ!
मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. या नात्यावरून वाद झाल्यानंतर प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. विशेष म्हणजे, पती, पत्नी आणि प्रियकर तिघेही पोलिसांसमोर उपस्थित झाले.
महिलेचे म्हणणे होते की, पती दिवसा कामावर जात असल्याने त्या वेळेत तिला प्रियकरासोबत राहू द्यावे आणि रात्री पती घरी आल्यानंतर त्याच्यासोबत राहण्यास ती तयार आहे.
‘ड्युटी चार्ट’ पाहून पोलिसही बुचकळ्यात!
महिलेने केवळ मागणीच केली नाही, तर आपल्या दिनक्रमाचे नियोजन सांगणारा ‘ड्युटी चार्ट’ पोलिसांसमोर मांडल्याचे सांगितले जाते. तिच्या या अनोख्या मागणीमुळे पोलिसांसमोर कायदेशीर आणि कौटुंबिक पेच निर्माण झाला.
तिघेही एकत्र राहण्यास तयार असले तरी दोन नणंदा आणि सासरे या व्यवस्थेला विरोध करत असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.

प्रेम, लग्न आणि आता ‘टाइमटेबल’!
सामान्यतः पती-पत्नीच्या वादात समेट घडवून आणण्याचे काम पोलिस करतात. मात्र या प्रकरणात ‘कोणासोबत कधी राहायचे?’ याचे वेळापत्रकच समोर आल्याने पोलिसांसमोरचा प्रश्न काहीसा वेगळाच ठरला आहे.
या विचित्र प्रकरणाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून, ‘प्रेमाला टाइमटेबल लावता येतं का?’ असा मिश्कील सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांकडून मात्र प्रकरणातील परिस्थिती आणि संबंधितांची भूमिका समजून घेऊन योग्य तो तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.









