न्यूयॉर्कमधील ‘वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी’ कार्यक्रमात सरसंघचालकांचे परखड मत; विविधतेचा स्वीकार, सन्मान आणि जतन करण्याचे आवाहन
न्यूयॉर्क : ‘जर एखाद्या हिंदूला असे वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू असू शकत नाही,’ असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा आहे आणि मानवतेमध्ये कोणताही भेदभाव नसावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यूयॉर्क येथे शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या ‘वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी’ कार्यक्रमात भागवत बोलत होते. यावेळी त्यांनी मानवतेची एकता, भारताची सांस्कृतिक भूमिका, विविधतेचा स्वीकार आणि सामाजिक समरसता या विषयांवर विचार मांडले.
‘विविधता ही आंतरिक एकतेची सजावट’
भागवत म्हणाले, ‘‘आरएसएसचा विश्वास आहे की संपूर्ण मानवता एक आहे. विविधता असूनही आपण सर्व एक आहोत, हा संदेश जगभर पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. विविधता ही आपल्या आंतरिक एकतेची सजावट आहे. त्यामुळे विविधतेचा स्वीकार, सन्मान आणि जतन केले पाहिजे.’’
भारताच्या परंपरेत मानवतेच्या एकतेचा विचार पूर्वीपासूनच असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यानंतर देशाला मिळालेल्या संविधानातही समानता आणि एकतेवर भर देण्यात आला आहे; मात्र प्रत्यक्षात या मूल्यांची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘राजकारण स्वार्थाचा खेळ बनले’
मानवतेतील एकता आणि सामाजिक समरसता केवळ राजकारणाच्या माध्यमातून साध्य होऊ शकत नाही, असे भागवत यांनी सांगितले. ‘‘हे सांगताना मला खेद वाटतो; परंतु सत्य हेच आहे की राजकारण आता स्वार्थाचा खेळ बनले आहे. जिथे ‘मी’ आणि ‘माझे’ हा विचार असतो, तिथे कोणताही उपाय नाही. त्याऐवजी ‘आम्ही’ आणि ‘आमचे’ हा विचार स्वीकारला पाहिजे,’’ असे ते म्हणाले.
भारतात सामाजिक परिवर्तनाची सुरुवात समाजापासूनच करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सेवा कार्यात धर्माचा भेद केला जात नाही
संघाच्या सेवा कार्याचा उल्लेख करताना भागवत यांनी संवाद आणि सेवा हे सामाजिक एकतेचे महत्त्वाचे टप्पे असल्याचे सांगितले. संवाद हे पहिले पाऊल, तर सेवा हे दुसरे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघाचे स्वयंसेवक लोकांच्या सहकार्याने देशभरात १.३० लाखांहून अधिक सेवा प्रकल्प चालवत असल्याचा दावा त्यांनी केला. या सेवा प्रकल्पांमध्ये मदत करताना संबंधित व्यक्ती कोणत्या धर्माची आहे, याचा विचार केला जात नाही, असे भागवत म्हणाले.
सेवा कार्याच्या बदल्यात कोणताही राजकीय फायदा किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘मानवतेची एकता हाच भारताचा पारंपरिक विचार’
भारताने जगाला मानवतेच्या एकतेचा संदेश दिला असल्याचे भागवत यांनी सांगितले. विविधतेतून एकता आणि परस्पर सन्मानाची भावना मजबूत करण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.








