2016च्या UPSC परीक्षेतील ओबीसी उमेदवारांबाबत गंभीर आरोप
‘मेरिटवर निवड होऊनही नॉन-क्रीमी लेअरच्या अटीचे कारण देत संधी नाकारली’
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 2016 मध्ये यूपीएससी परीक्षेत मेरिटवर उत्तीर्ण झालेल्या 314 ओबीसी विद्यार्थ्यांना नॉन-क्रीमी लेअरच्या अटीचे कारण देत आयएएस आणि आयपीएस होण्यापासून रोखण्यात आले, असा दावा त्यांनी केला.
वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार ‘मनुवादी विचारांचे’ असून बहुजन आणि ओबीसी समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘मेरिटवर निवड होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी नाकारली’
वडेट्टीवार म्हणाले की, 2016 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत सुमारे 314 ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र, नॉन-क्रीमी लेअरच्या अटीचा आधार घेत त्यांना प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची संधी देण्यात आली नाही, असा त्यांचा दावा आहे.
‘ही सर्व मुले मेरिटवर निवडली जाऊ शकली असती. मात्र, त्यांना संधी नाकारण्यात आली. दुसरीकडे कमी गुण मिळालेल्या ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करण्यात आले,’ असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
‘भागवतांनी न्यूयॉर्कमध्ये मांडलेले विचार भारतातही बोलावेत’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमधील ‘वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी’ कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचाही वडेट्टीवार यांनी संदर्भ घेतला.
‘मोहन भागवत यांना देशात बोलण्याची संधी नाही का? ते न्यूयॉर्कमध्ये जाऊन बोलतात,’ असा सवाल त्यांनी केला. भागवत यांनी अमेरिकेत मांडलेले सामाजिक समतेचे आणि सर्वधर्मीयांच्या सहअस्तित्वाचे विचार भारतातही प्रत्यक्ष कृतीत उतरवले पाहिजेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्रातील काही मंत्र्यांकडून इतर धर्मीयांविषयी केलेल्या वक्तव्यांचाही त्यांनी निषेध केला. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कृतींना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
‘राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही’
काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये कथित जातीय भेदभावाच्या घटनांवरूनही वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यांवर आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावर टीका केली जाते आणि गुन्हे दाखल केले जातात, असा आरोप त्यांनी केला.
‘अशा प्रकारे गुन्हे दाखल करून राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही,’ असे वडेट्टीवार यांनी सांगितले. सर्व धर्मांच्या नागरिकांना आपापल्या धर्मासाठी काम करण्याचा अधिकार असला पाहिजे आणि धार्मिक तेढ निर्माण करणे हा गुन्हा मानला गेला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘केवळ विश्वगुरू म्हणवून घेऊन उपयोग नाही’
देशातील परिस्थिती गेल्या काही वर्षांत खराब झाल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, केवळ भारताला ‘विश्वगुरू’ म्हणवून घेऊन परिस्थिती बदलत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष काम करणे आवश्यक आहे.
‘विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत’
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दाही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यांना जखमी करणे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे ही लोकशाहीची गळचेपी असल्याचे ते म्हणाले.
‘लोकशाहीमध्ये आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे हा गुन्हा नाही. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे ही रास्त मागणी आहे,’ असे वडेट्टीवार यांनी सांगितले.








