तडीपारांवर पोलिसांचा वॉच; १७ जणांवर हद्दपारीची कारवाई
🛑 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापेठ पोलिसांची कडक भूमिका; प्रमुख चौकांत तडीपार आरोपींची नावे-छायाचित्रे असलेली फलके
अमरावती : आगामी गणेशोत्सव आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राजापेठ पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १७ जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. तडीपार करण्यात आलेले आरोपी आदेशाचे उल्लंघन करून शहरात आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
राजापेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी अधीनस्थ डीबी पथकाला तडीपार आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तडीपार आरोपी शहरात किंवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळल्यास तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे नागरिकांना तडीपार आरोपींबाबत माहिती देणे सोपे व्हावे, यासाठी राजापेठ पोलिसांनी प्रमुख चौकांमध्ये तडीपार आरोपींची नावे व छायाचित्रे असलेली फलके लावली आहेत.
📌 तडीपार आरोपींना आश्रय दिल्यासही कारवाई
तडीपार आरोपी शहरात राहत असल्याची, कोणत्या ठिकाणी थांबत असल्याची किंवा त्याची ये-जा सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे. तसेच तडीपार व्यक्तीशी कोणाचा संपर्क असल्याचे किंवा तो पुन्हा गुन्हेगारी कृत्यात सहभागी होत असल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तडीपार आरोपींना आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असून, माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
📌 हे १७ जण तडीपार
आदित्य आमटे, कुशल बोबडे, सतीश पालवे, संकेत घुगे, सागर यादव, विक्की खडसे, रोहित कोरटकर, केशव नारायणी, देवा मडावी, युवराज कुरवाने, अभय झांझोटे, भाग्येश जाने, यश कडू, सुजल जायभाये, अभिषेक डिक्याव, पंकज गोंडाने आणि शुभम बोयत यांचा तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
📌 तडीपार आरोपी दिसल्यास पोलिसांना कळवा
- आरोपी शहरात किंवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिसल्यास.
- तो कुठे राहत किंवा थांबत असल्याची माहिती मिळाल्यास.
- त्याची ये-जा, वाहन किंवा ठिकाणाची माहिती मिळाल्यास.
- तडीपार कालावधीत त्याच्याशी कोणाचा संपर्क असल्याचे आढळल्यास.
- तो पुन्हा गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याची माहिती मिळाल्यास.
अशा प्रकारची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन राजापेठ पोलिसांनी नागरिकांना केले आहे.








