कळमेश्वरमध्ये २३ झाडांच्या वृक्षतोडीवरून नागरिक आक्रमक!
सिमेंट रस्ता आणि उंच नाल्यांच्या बांधकामावरही प्रश्नचिन्ह; वृक्षतोड तातडीने थांबविण्याची मागणी
का टा वृत्तसेवा | प्रतिनिधी
कळमेश्वर : कळमेश्वर शहरातील मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामावरून आणि नगर परिषदेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या २३ झाडांच्या वृक्षतोडीवरून शहरात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नगर परिषद कळमेश्वर-ब्राह्मणीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिर सूचनेमुळे हा विषय ऐरणीवर आला असून, प्रस्तावित वृक्षतोड कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

नगर परिषदेत नागरिकांनी प्रत्यक्ष नोंदविला तीव्र आक्षेप!
दरम्यान, प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात कळमेश्वर शहरातील नागरिकांनी आज (दि. ६ नोव्हेंबर) नगर परिषद कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी स्वरूपात सामूहिक हरकत व आक्षेप नोंदविला. यामध्ये सर्वश्री संजय विठोबाजी धोंगडी, राजेश श्रीखंडे, चंद्रकांत गाठीबांधे, रामेश्वर सहारे, अश्विनी धोंगडे, विकी पादाडे, सागर मरडवार, प्रवीण टाकळकडे, सूर्यकांत गाठीबांधे, मुस्ताक हकीम शेख, बालू शेंडे, राजेश बोर्डे, सचिन इखार, सुनील श्रीखंडे, प्रदीप चनकापुरे, नितीन काळबांडे, प्रशांत धरपाळ, महेंद्र शेंडे, सामाजिक कार्यकर्ते कळमेश्वर योगेश कुंजाम, अजय मरकाम , पवन काळमेघ, चुन्नीलालजी मरकाम, आदित्य गुल्हाने, उमेश काळबांडे , परमलाल मालवी इ. यांच्यासह नगरसेवक सर्वश्री सत्यवान मेश्राम, अश्विनी संजय धोंगडी, सुमेर भोस्कर, विलास मानकर, अजय मुंडवाईक इत्यादी पर्यावरण प्रेमी नागरिकांचा समावेश होता.

यावेळी नागरिकांनी प्रस्तावित २३ झाडांची वृक्षतोड कोणत्याही परिस्थितीत करू नये, तसेच सुरू असलेल्या रस्ता व नाल्यांच्या बांधकामाचा पुनर्विचार करून नागरिकांच्या समस्या आणि पर्यावरणाचे संरक्षण यांना प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी केली. नागरिकांच्या या सामूहिक भूमिकेमुळे कळमेश्वरमधील वृक्षसंवर्धनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.


उंच नाल्यांमुळे घरे, दुकाने खोलगट स्थितीत!
शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या व उंच नाल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. परिणामी रस्त्यालगत असलेली दुकाने, घरे आणि दवाखाने रस्त्याच्या तुलनेत खोलगट स्थितीत गेल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात पावसाचे पाणी घरांमध्ये, दुकानांमध्ये व व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये शिरण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वीच मोठ्या नाल्यांपासून सुमारे दहा फूट अंतरावर दोन्ही बाजूंना पक्क्या नाल्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. असे असताना नव्याने मोठ्या नाल्यांची आवश्यकता काय? या बांधकामाचा तांत्रिक आधार कोणता? तसेच यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वृक्षतोडीची परिस्थिती का निर्माण होत आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दोन बायपास असताना शहरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण कशासाठी?
कळमेश्वर शहराच्या दोन्ही बाजूंनी मोठे बायपास महामार्ग उपलब्ध असताना शहराच्या अंतर्गत मुख्य रस्त्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण करण्याची नेमकी गरज काय, असा सवाल जाणकार नागरिक उपस्थित करीत आहेत. विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, व्यापारी प्रतिष्ठानांवर आणि शहराच्या नैसर्गिक पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असेल, तर अशा विकासकामांचा पुनर्विचार होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

२३ झाडांवर कुऱ्हाड; नागरिकांना पुरेशी माहिती आहे का?
नगर परिषदेच्या जाहिर सूचनेत विविध प्रजातींची २३ झाडे तोडण्यासंदर्भातील प्रस्तावाचा उल्लेख आहे. मात्र शहरातील अनेक नागरिकांना या वृक्षतोडीची माहितीच नसल्याची चर्चा आहे. शहरातील पर्यावरणाशी संबंधित एवढा महत्त्वाचा निर्णय घेताना नागरिकांना विश्वासात घेण्यात आले का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
विकासकामे, औद्योगिकीकरण आणि नागरी विस्ताराच्या नावाखाली देशभर वृक्षतोड सुरू असल्याने तापमानवाढ, पाणीटंचाई, दुष्काळ आणि पर्यावरणीय असंतुलनाची समस्या अधिक गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत अस्तित्वात असलेली झाडे जपण्याऐवजी त्यांच्यावर कुऱ्हाड चालविण्याची वेळ का आणली जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
नगरसेवक आणि आमदारांची भूमिका काय?
शहरातील एवढ्या महत्त्वाच्या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. नागरिकांच्या समस्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले नगरसेवक या प्रकरणात कोणती भूमिका घेणार? स्थानिक आमदार या वृक्षतोडीबाबत हस्तक्षेप करणार का? प्रशासन नागरिकांच्या तक्रारींची दखल घेणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

बांधकाम थांबवा, आधी जनसुनावणी घ्या!
प्रस्तावित वृक्षतोड तातडीने थांबवावी, सुरू असलेल्या वादग्रस्त बांधकामाची तांत्रिक तपासणी करावी, जुन्या व नव्या नाल्यांच्या आराखड्याची तुलना करावी, पावसाळ्यातील पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था तपासावी आणि नागरिकांसमोर संपूर्ण प्रकल्पाचा आराखडा सादर करावा, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या मते, शहराचा विकास व्हायलाच हवा; मात्र तो नागरिकांचे नुकसान करून आणि पर्यावरणाचा बळी देऊन नको. झाडे तोडण्यापूर्वी पर्यायी उपायांचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वृक्षतोडीला स्थगिती द्यावी, अन्यथा नागरिकांचा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

आता प्रश्न एवढाच आहे की, कळमेश्वरचा विकास नेमका नागरिकांसाठी होतोय की नागरिकांच्या अस्तित्वातील सोयी-सुविधा आणि शहराची हिरवाई संपवून?
![]()






