श्रीलंका दौऱ्यासाठी ध्रुव पिसे यांची निवड; तेली युवा एकता मंचातर्फे गौरव!

श्रीलंका दौऱ्यासाठी ध्रुव पिसे यांची निवड; तेली युवा एकता मंचातर्फे गौरव!

सावनेरच्या युवा क्रिकेटपटूचा सन्मान; ग्रामीण भागातील तरुणांसमोर ठेवला प्रेरणेचा आदर्श

का टा वृत्तसेवा | भूषण सवाईकर

सावनेर : मेहनत, जिद्द, सातत्य आणि स्वप्नांवर असलेला ठाम विश्वास यांच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे सावनेर येथील युवा क्रिकेटपटू ध्रुव पिसे यांनी सिद्ध केले आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टेस्ट-ट्वेंटी क्रिकेट फॉरमॅटमध्ये निवड झाल्याबद्दल तेली युवा एकता मंच, सावनेर यांच्या वतीने ध्रुव पिसे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

ध्रुव पिसे यांची १० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यातील क्रिकेट उपक्रमासाठी निवड झाली आहे. या निवड प्रक्रियेत देशभरातून ८० मुले आणि ८० मुली अशा एकूण १६० खेळाडूंना संधी मिळाली आहे. या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स, मॅथ्यू हेडन, सर क्लाइव्ह लॉईड तसेच भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांसारख्या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

सावनेरसारख्या शहरातील युवा खेळाडूला अशा प्रतिष्ठित क्रिकेट उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणे ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. ध्रुव यांच्या या यशाचे कौतुक करत तेली युवा एकता मंचाच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. खेळात यश मिळविण्यासाठी केवळ गुणवत्ता पुरेशी नसून कठोर परिश्रम, शिस्त, संयम आणि नियमित सराव यांची जोड आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या सत्कारप्रसंगी ध्रुव यांचे वडील श्री. शक्ती पिसे, आई सौ. आरती पिसे तसेच पिसे कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते. मंचाच्या सदस्यांनी ध्रुव यांना पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत त्यांनी भविष्यात देशाचे आणि सावनेरचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

युवकांसाठी प्रेरणादायी यश

ध्रुव पिसे यांची निवड ही ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. योग्य संधी, कुटुंबीयांचा पाठिंबा, कठोर मेहनत आणि समाजाचे प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील तरुणही मोठ्या व्यासपीठावर आपली ओळख निर्माण करू शकतात, हा संदेश त्यांच्या यशातून मिळतो.

समाजातील गुणवंत व होतकरू युवकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प तेली युवा एकता मंचाने व्यक्त केला. ध्रुव पिसे यांच्या पुढील वाटचालीसाठी मंचाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.



📢 कामगार टाइम्स* बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : भूषण सवाईकर : 📲 97645 07440

कार्यालय फ़ोन नं. 07118-272000/ 9404517414

0
0

Leave a Reply

Realted News