भारतीय लोकशाही मजबूत आहे, पण द्वेषाच्या वातावरणात संविधानाला धोका आहे : विजय वडेट्टीवार यांचा इशारा
मुंबई : विधानसभेत आज संविधानावर चर्चा सुरू झाली. त्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संविधान हा सर्वच धर्मग्रंथांहून सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे नमूद करत त्याची पायमल्ली कोणत्याही स्थितीत सहन करणार नसल्याचा सरकारला इशारा दिला. भारतीय लोकशाही मजबूत आहे, पण सध्याच्या द्वेषपूर्ण वातावरणात संविधानाला धोका निर्माण होत आहे. संविधानाला बदलता येणार नाही, पण कुणी असा प्रयत्न केला तर त्या्ंची सत्ता बदलली जाईल, असे ते म्हणाले.
भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षानिमित संविधानाची गौरवशाली वाटचाल या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, भारताचे नागरीक म्हणून आपले अधिकार काय, आपली कर्तव्य काय आहेत हे आपल्याला संविधानाने शिकवले. त्यामुळे संविधान हा इतर कोणत्याही धर्मग्रंथांहून सर्वश्रेष्ठ आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर महात्मा गांधी यांनी देशाचे संविधान तयार करण्याची जबाबदारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्याची सूचना केली. त्यानुसार सगळ्यात जास्त पदवी घेतलेले आणि विद्वान असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे प्रमुख बनले.
संतांच्या शिकवणूकीतूनचसंविधानाचा पाया
आपल्या संविधानाचा पायाच मुळात संतांच्या शिकवणूकीतून आला आहे. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता, आणि सामाजिक विषमता यांना विरोध केला. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी आत्मोन्नती आणि विवेकवादाचा पुरस्कार केला. संविधानाच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य यांना मान्यता देण्यात आली आहे. संत जनाबाई आणि संत बहिणाबाई यांनी महिलांच्या सन्मानाचा पुरस्कार केला. याचेही प्रतिबिंब संविधानात आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
मराठी साहित्य संलेनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी आपल्या भाषणात पुरोगामी महाराष्ट्र आणि संत परंपरेची आठवण करून दिली. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये पुरोगामी विचारसरणीतून निष्पन्न झालेली आहेत. आणि तेच संविधानात दिसते. फुरोगामी म्हणून हेटाळणी करणाऱ्याना मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी सत्य बोलून दाखवले, असे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी मांडले.
महाराष्ट्रात संविधानाच्या पायमल्लीची सुरुवात एका राज्यपालाने केली.
पण आता मात्र संविधानाची पायमल्ली केली जात आहे. महाराष्ट्रात याची सुरुवात एका राज्यपालाने केली. राज्यातील सर्वोच्च पदावर बसून त्यांनी राजकीय निर्णय घेतले. राजकीय वक्तव्ये केली. या राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांच्याबाबत अश्लाघ्य वक्तव्य केले. यानंतर दोन पक्ष फोडून महायुती सरकार आले, या प्रकरणी तीन वर्ष झाले तरी कोर्टात निकाल आलेला नाही. भारतीय लोकशाही मजबूत आहे, पण सध्या मात्र द्वेषाच्या वातावरणात संविधानाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संविधानाला बदलता येणार नाही, जे असा प्रयत्न करतील त्यांची सत्ता बदलली जाईल, असे वडेट्टीवार आपल्या भाषणात म्हणाले.
संविधानात अनेक मूलभूत तत्व आहेत त्यातील मूलभूत तत्व म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव. बाबासाहेबांनी राजकारण आणि धर्म वेगळा रहावा यावर जोर दिला. त्यानुसार सरकार आणि सरकारी यंत्रणांनी सर्वांशी समान वागणे अपेक्षित आहे, पण आपल्या राज्यात संविधानाची शपथ घेऊन एका समाज विरोधात सतत द्वेषपूर्ण विधान करत आहे. हे संविधानाला छेद देणारे आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्रात आज कोणत्याही महापालिकेत लोकनियुक्त शासन नाही, लोकप्रतिनिधी नाही, निवडणुका होत नाही ही संविधानाची पायमल्ली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.