February 7, 2026 4:28 pm

CM Devendra Fadanvis : शब्दांचे विष नागाच्या विषापेक्षा घातक

मुख्यमंत्री फडणवीस यांचा आमदारांना संयमाने वागण्याचा सल्ला 

का टा वृत्तसेवा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेला उत्तर दिले. त्यात त्यांनी शब्दांचे विष नागाच्या विषाहून अधिक विषारी असल्याचे नमूद करत आमदारांना संयमाने वागण्याचा सल्ला दिला. विधानसभेतून समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे. पण येथून लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर आपण सर्वांनी याविषयी चिंतन करण्याची गरज आहे. निवडून आल्यानंतर आपण सर्वांनी संसदीय परंपरांचे पालन, संसदीय भाषेचे पालन व सातत्यपूर्ण संवाद या त्रिसूत्रीचे पालन केले, तर निश्चितच आपल्याला एक चांगला संदेश देता येईल, असे ते म्हणाले.
                         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले, अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यासाठी मी उभा असताना माझ्यासह आपल्या सर्वांच्या मनात वेदना आहेत. आपण अधिवेशन संपवतोय, पण ज्या काही घटना या अधिवेशनात घडल्या आहेत, त्यातून नेमका काय संदेश आपण घेऊन जाणार आहोत? लोकांना काय संदेश आपण देत आहोत? ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही, मंत्र्यांच्या मालकीची नाही, मुख्यमंत्र्यांच्या मालकीची नाही. कुठल्या कर्मचाऱ्यांच्याही मालकीची नाही. ही विधानसभा महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या मालकीची आहे.

शब्दांचे विष नागाच्या विषाहून अधिक घातक

                          विधानसभेत समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. पण या ठिकाणी विचारातून, चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर आपण सर्वांनी त्यावर चिंतन करण्याची गरज आहे. मी अध्यक्षांचे आभार मानेन की, त्यांनी हे प्रकरण अत्यंत गांभिर्याने घेतले. दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते लोक आले होते की नव्हते हे सोडले, तर त्या दोघांनीही याठिकाणी खेद व्यक्त केला. पण माझ्या मते, शब्दांतून निघणारे विष हे एखाद्या नागाच्या विषाहूनही जास्त विषारी असते. त्यामुळे याठिकाणी चर्चा, चर्चेचा स्तर राखून कटूता निर्माण होणार नाही असा प्रयत्न केला पाहिजे.

त्रिसुत्री पाळण्याचा दिला सल्ला

                         मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अनेकदा प्रसंग येतात. शेवटी आपण माणूस आहोत. राग अनावर होतो. पण त्यानंतरही आपल्या चर्चेचा स्थायीभाव हा मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे. आपण पाहिले, कुणी मीडियासमोरच अश्लील घोषणा देत आहे, कुणी अजून काही बोलत आहे, कुणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांवरच मॅनेज असल्याचे बोलत आहे. मला असे वाटते की, या सभागृहाने एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे. या सभागृहात 288 सदस्य आहेत. नियमाने या ठिकाणी फक्त 45 लक्षवेधी झाल्या पाहिजेत. पण अध्यक्ष 45 च्या ऐवजी 200 लक्षवेधी करतात. पण त्यानंतरही 288 सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाहीत.
                        अशा परिस्थितीत आपण जी काही भाषा या ठिकाणी वापरतो. ती भाषा काही योग्य नाही. त्रिभाषा सूत्रावरही बरीच चर्चा झाली. आता कुठली भाषा कुठल्या वर्गात शिकवायची त्याचा निर्णय समिती करेन. पण माझ्या मते, आपल्याला निवडून आल्यानंतर एक त्रिसुत्री या प्रकरणी ठरवावी लागेल. ती म्हणजे संसदीय परंपरांचे पालन, संसदीय भाषेचे पालन व सातत्यपूर्ण संवाद. ही त्रिसुत्री पाळली तर याठिकाणी निश्चितपणे आपण त्यातून एक चांगला संदेश देऊ शकतो, असे ते म्हणाले.

गुन्हेगार मंडळी आत आलीच कशी?

                          मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, काल या ठिकाणी जी हाणामारी झाली. खरे म्हणजे कुणीही कुणाहीसोबत येत आहे या प्रकरणी काही ना काही शिस्त असली पाहिजे. आपण पाहिले तर ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर 6 गुन्हे आहेत. नितीन हिंदुराव देशमुख यांच्यावर 8 गुन्हे आहेत. यांची पार्श्वभूमी एवढी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. अशी मंडळी येथे येऊन मारामारी करतात. हे योग्य नाही. त्यामुळे सदस्यांनी यासंबंधी लक्षात घेतले पाहिजे.

 

0
0

Leave a Reply

Realted News