दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू इस्थर कुजूरचा सत्कार करताना ॲड. फिरदोस मिर्झा,डाॅ. गिरीश गांधी व ज्ञानेश्वर रक्षक.
दिव्यांग ‘इस्थर’चा संघर्षमय प्रवास समाजासाठी प्रेरणा : ॲड. फिरदोस मिर्झा
इस्थरला ऑलिम्पिकचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ५० हजारांची मदत
नागपूर : शहरातील युवा खेळाडू इस्थर कुजूर ही जिद्दीने स्वप्नांचा पाठलाग करीत असताना अचानक एका रस्ता अपघातात तिला पाय गमवावा लागला. मात्र त्या दुर्दैवी घटनेनंतर हार न मानता तिने जिद्दीने परिस्थितीला सामोरे जाऊन दिव्यांगांच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. इस्थरचा हा संघर्षमय प्रवास क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या समाजातील अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणादायी असल्याची भावना, कायदेतज्ज्ञ ॲड. फिरदोस मिर्झा यांनी व्यक्त केली.
इस्थरला सोमवारी शंकरनगर येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे डाॅ. गिरीश गांधी होते. याशिवाय व्यासपीठावर कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती प्रतिष्ठानचे विश्वस्त ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते.

सत्कारमूर्ती इस्थरचे अभिनंदन करीत ॲड. मिर्झा म्हणाले, खेळाडू असो वा सर्वसामान्य मुलगा किंवा मुलगी, त्याने काहीही नाउमेद होऊ नये. हे इस्थरसारख्या दिव्यांग महिला खेळाडूंकडून शिकण्यासारखे आहे. तिच्यात पुढे जाण्याची जिद्द आणि आत्मविश्वास असल्यामुळेच ती पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरली आहे. इस्थरचे पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न व इच्छा आहे. भविष्यात नक्कीच ती आपले स्वप्न पूर्ण करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. समाजातील इतरही अनेक गरजू खेळाडूंना मदतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. मिर्झा यांनी यावेळी खेळाडूंना मिळणाऱ्या सोयी सुविधांवर बोट ठेवून नव्या शैक्षणिक धोरणात खेळाला पुरेसे महत्त्व न दिव्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
ज्ञानेश्वर रक्षक यांनी प्रास्ताविकात पुरस्कार देण्यामागची भूमिका मांडली. मृण्मयी रक्षक यांनी संचालन व सत्कारमूर्तीचा परिचय करून दिला. कांचन रक्षक यांनी मानपत्राचे वाचन केले. तर गुरुदेव रक्षक यांनी उपस्थितांचे आभार मानले. हेमंत रक्षक, भागवत रक्षक, गीता गायधने व अनंता रक्षक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचाराचे प्रचारक मोहनदास चोरे व अन्य सहकाऱ्यांनी तुकडोजी महाराजांची भजने व सामुदायिक प्रार्थना सादर केली.
अध्यक्षीय भाषणात डाॅ. गिरीश गांधी यांनीही इस्थरच्या संघर्षाची कहाणी नागपूर व विदर्भातील शेकडो दिव्यांग व धडधाकट खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, काही खेळद स्वप्न पाहतात. मात्र स्वप्नपूर्ती करण्यात अपयशी ठरतात. मात्र काही खेळाडू स्वप्नही पाहतात आणि जिद्दीने ते पूर्णही करतात. इस्थर ही अशाच खेळाडूंपैकी एक आहे. विपरित परिस्थिती किंवा संकटे आल्यावर रडत बसण्याऐवजी, त्यातून योग्य मार्ग काढून पुढे जाण्यात खरा शहाणपणा असतो. इस्थरने नेमके हेच केले. तिचा हा गुण समाजातील इतरही नवोदित व होतकरू खेळाडूंना नवी उमेद व प्रेरणा देणारा आहे. समाजाने अशा खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे सांगून, त्यांनी इस्थरला ऑलिम्पिकचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ५० हजारांची मदत देण्याची घोषणा यावेळी केली.