August 15, 2025 3:04 am

सरकारची निवडणूक तयारी; 65 शहरांसाठी 500 काेटींचा निधी

महापालिका-नगरपालिकांच्या विकासकामांसाठी निधी, नगरविकास विभागाने काढले आदेश

पुणे/ मुंबई :  येत्या नाेव्हेंबर-डिसेंबरमध्ये महापालिका, नगरपालिका निवडणुका हाेण्याची शक्यता असल्याने राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या ट्रीपल इंजिन सरकारने गेल्या दाेन दिवसात राज्यातील ६५ नगरपालिका, नगरपंचायत व महापालिका शहर क्षेत्राच्या विकासकामांसाठी ५०० काेटी रुपये वितरित करण्याचे वेगवेगळे आदेश जारी केले आहेत. साेमवारनंतर पुन्हा काही शहरांसाठी निधी मिळणार आहे. महायुतीची ही निवडणूक तयारीच मानली जात आहे.
                         एकीकडे महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयाेगाच्या सूचनेनुसार महापालिकांनी आपल्या प्रभागांची प्रारूप रचना राज्य सरकारकडे सुपूर्द केलेली असून २२ ऑगस्टनंतर ती टप्प्याटप्प्याने नागरिकांकडून हरकती, सूचना मागवण्यासाठी प्रसिद्ध केली जाणार आहे. १३९ नगरपालिकांच्या निवडणुकांसाठीही प्रभागरचेनचाही कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचा निधी वितरित करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू झाला आहे. साेमवारनंतर पुन्हा काही आदेश निघणार आहेत.

मुंबई, नागपूर, चंद्रपूर, काेल्हापुरात सर्वाधिक निधी

                         या निधी वितरणात मुंबई उपनगरासाठी ३६.६२ काेटी, नागपूर जिल्ह्यातील कामठी, महादुला, पिंपळा, बहादुरा या नगरपंचायतींसाठी ४० काेटी रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, भंडणगड, दापाेलीसाठी १९.९० काेटी, काेल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, वडगाव, शिराेळ, कुरुंदवाड, हातकणंगलेसाठी १६.६ काेटी, नाशिक उद्याेग भवनासाठी १६ काेटी व अन्य कामासाठी १३.७५ काेटी असे एकूण ३०.३६ काेटी ६१ लाख, बदलापूर व मुरबाडसह ठाण्यात १६.९० काेटी, सांगली जिल्ह्यातील १० नगरपालिकांसाठी १०.५ काेटी, कर्जत, काेपरगावसाठी २ काेटी, उरण (रायगड) साठी १५ काेटी, देऊळगाव, सिंदखेड (बुलडाणा) ५ काेटी, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, बल्लारपूर, पाेचुर्णा नगरपंचायतीसाठी १० काेटी, मलकापूर (सातारा) २०.८० काेटी अशा राज्यातील ६५ नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका शहरांसाठी ५०० काेटी रुपयांचा निधी वितरित केला गेला.

पुण्यासाठी सहा हजार काेटींचा विकास आराखडा हाेताेय तयार

                         पुणे शहर व आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यासाठी ६ हजार २०० कोटी रुपये गुंतवणूक करून हाेणाऱ्या विकासाचा आराखडा तयार हाेत आहे. पुणे-नाशिक हाय-स्पीड रेल्वे, १० मेट्रो रेल्वे लाइन्स, दोन रिंग रोड, १२ लॉजिस्टिक्स हब, नऊ ट्रक टर्मिनल आणि २६ टाऊनशिप या विकास आराखड्यात समाविष्ट आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठवड्यातून एकदा तरी पुणे जिल्ह्याच्या दाैऱ्यावर येतात.

महायुतीकडून टार्गेट नगरपालिका, महापालिका

                          प्रशासकीय पातळीवर ही तयारी सुरू असताना राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने १२ आणि १३ ऑगस्ट या दाेन दिवसांत वेगवेगळे आदेश काढत राज्यातील ६५ नगरपालिका, महापालिका शहरांसाठी ५०० काेटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. विशेष म्हणजे मुंबईसाठी ऑरेंज गेट ते मरिन लाइन या भुयारी मार्गासाठी केंद्र सरकारच्या याेजनेतून १३२ काेटींचा निधी मुंबईला दिला आहे. एकूण २०० काेटी रुपये दिले जाणार आहेत. नगरविकास विभागाने काढलेले हे आदेश विशेष अनुदान, शहरातील विकासाच्या याेजना, रस्ते अनुदान अशा विविध याेजनांतून निघालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News