गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त
पोलिस मुख्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम
पुणे : राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने तो महागणेशोत्सव म्हणून साजरा होत आहे. या उत्सवाचे पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी साऊंड-लाइट शोने सजलेल्या कार्यक्रमाने उपस्थित भाविक व पोलीस कुटुंबियांना उत्साहाने भारावून टाकले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महोत्सवात प्रशिक्षित श्वानांचा डॉग शो विशेष आकर्षण ठरला. श्वानांच्या चपळ खेळींनी प्रेक्षकांची दाद मिळवली. पाईप बॅण्ड व पोलीस बॅण्डच्या सुरेल सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. तर शिवकालीन मर्दानी खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांमुळे दालनात उत्साहाची लाट उसळली.
यानिमित्ताने मुख्यालयात ‘मिशन परिवर्तन’ तर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी लागणार्या साहित्यांचे प्रदर्शन तसेच शिवकालीन शस्त्रांचे दर्शन घडविण्यात आले. शिस्तबद्ध आणि हरित उत्सव साजरा करण्याचा संदेश विविध उपक्रमांतून पोहोचवण्यात आला.
गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांसाठी खास रील मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून नागरिकांना संस्कृती आणि सुरक्षेचा सकारात्मक संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
![]()
या स्पर्धेसाठी तीन विषय जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये गणेशोत्सवादरम्यान २४ तास सज्ज असलेले पुणे पोलिस कर्मचारी, उत्सव साजरा करताना नागरिकांनी घ्यायची खबरदारी, तसेच गणेशोत्सवाचे सामाजिक व सांस्कृतिक पैलू या विषयांवर रील तयार करता येणार आहे. नागरिकांनी आपली रील ३ सप्टेंबरपर्यंत पुणे पोलिसांकडे पाठवायची आहे.
या स्पर्धेतील उत्कृष्ट रील्सना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, निवडक रील्स पुणे पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर पोस्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. रील तयार करताना कोणताही आक्षेपार्ह मजकूर किंवा दृश्य न वापरण्याचे तसेच नियमांचे उल्लंघन टाळण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारे मजकूर टाळण्याची विशेष दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपली रील इंस्टाग्रामवर पोस्ट करून @ पुणे पोलिस सिटी या हँडलला टॅग करावे आणि डायरेक्ट मेसेजद्वारे पोलिसांकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()
![]()
![]()