भ्रष्ट मंत्र्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने आमदार रोहित पवार संताप
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई करत नाही. हे सरकार घमंडी झाले असून, त्याचा माज उतरवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने सोमवारी नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाद्वारे अस्मानी व सुलतानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येणार आहे. या मोर्चात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे व आमदार जयंत पाटील यांच्यासह सर्वच ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहे. या मोर्चापूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
सरकार केवळ पैसेवाल्यांची बाजू घेते
रोहित पवार म्हणाले, भाजप सरकारचा कल खासगीकरणाकडे आहे. या सरकारने 10 हजार कोटी रुपयांहून अधिकची कामे ठेकेदारांना दिली आहेत. यातील बहुतांश कंत्राटदार भाजपच्या विचारांचे आहेत. नेत्यांना फायदा व्हावा म्हणून सरकारने सरकारी भरती बंद करून ठेकेदारांमार्फत भरती सुरू केली आहे. आदिवासी विभागाचे खासगीकरण करण्याची गरज नाही. आम्ही आगामी अधिवेशनात खासगीकरणाचा मुद्दा सभागृहात मांडू. आम्ही सामाजिक विषयात राजकारण न करण्याची काळजी घेतो. या प्रकरणी आंदोलक मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना अनेकदा भेटले. पण हे सरकार केवळ पैसेवाल्यांची बाजू घेते. त्यामुळे ते आदिवासींना न्याय मिळवून देईल असे वाटत नाही.
हे सरकार माजले
रोहित पवार यांनी यावेळी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. तसेच सरकारवर भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठिशी घालण्याचाही आरोप केला. ते म्हणाले, एकतर या सरकारला घमंड आहे. अहंकार आहे. त्याचे असे मत आहे की, आमचे सर्वात जास्त आमदार निवडून आलेत. ते कसे निवडून आलेत हे सर्वांना माहिती आहे. त्यांच्या घमेंडीमुळे कुणाचीही विकेट पडत नाही. या सरकारच्या मंत्र्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. आम्ही त्याचे पुरावे दिले. पण त्यानंतरही संबंधितांचे राजीनामे घेण्यात आले नाही. पुरावे देऊनही राजीनामा घेतला जात नसेल, तर हा कुठे ना कुठे तरी सरकारचा अहंकारच आहे. हे सरकार माजले आहे. त्याचा माज उतरवण्याची वेळ आता आली आहे.
सरकारने झोपेचे सोंग घेतले
रोहित पवारांनी यावेळी जनतेला आपल्या पक्षाच्या मोर्चात सहभागी होण्याचेही आवाहन केले. झोपेचं सोंग घेतलेल्या आणि शेतकरी कर्जमाफीसह अनेक खोटी आश्वासनं देऊन जनतेला फसवणाऱ्या स्वार्थी सरकारविरोधात नाशिकमध्ये थोड्याच वेळात बळीराजाचा आक्रोश मोर्चा सुरू होतोय.. पाऊस आला तरीही अन्नदात्याच्या हक्काच्या या लढ्यात हजारोंच्या संख्येने सामील व्हा, असे ते म्हणाले.













Users Today : 3
Users Yesterday : 11