December 1, 2025 6:33 am

धुवाधार पावसाने संत्राबागा जमीनदोस्त, कपाशीसह मोसंबी भुईसपाट – पिकांची नासाडी

सावनेर-कळमेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा योग्य मोबदला मिळवून देणार : आमदार डॉ आशिष देशमुख

काटा वृत्तसेवा I नागपुर : काल दिनांक 26 रोजी सावनेर-कळमेश्वर तालुक्यातील तिडंगी, तेलगाव, दाढेरा, माळेगाव, नांदागोमुख, सालई यासारख्या अनेक गावात पावसाच्या हाहाकारामुळे शेतकऱ्यांचे कापूस, तूर या प्रकारचे पीक, फळबागा गळल्या. संत्र्याच्या झाडांचे नुकसान होऊन कित्येक झाडे पडली, भाजीपालाचे नुकसान झाले.

                       या आसमानी संकटाची पाहणी आमदार डॉ आशिष देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भर पावसात केली. आमदार डॉ. देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर गेले व सर्व पिकांची पाहणी केली. तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर दिला. त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे व्यवस्थित पंचनामे करावे जेणेकरून कपाशी, तूर, संत्रा, भाजीपाला तसेच सर्व पिकांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मदत होईल.

                       आ. डॉ. देशमुख यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले की, शासन दरबारी पाठपुरावा करून जास्तीतजास्त नुकसान भरपाई करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु. यावेळी डॉ राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, दिगंबर सुरतकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार विकास बिक्कड, खंड विकास अधिकारी अंशुजा गराटे, तहसीलदार अक्षय पोयम, कृषी अधिकारी दीपाली कुंभारे, रचना चौहान, मोनाली कुंभारे उपस्थित होते.

कपाशी-तूर सह संत्रा, मोसंबी भुईसपाट

                 सावनेर, कळमेश्वर, कामठी, काटोल तालुक्यांना सर्वाधिक फटका :                रस्त्यांवर झाडे पडली, वीज बंद, वाहतूक विस्कळीत

                       नागपुरात शुक्रवारी सायंकाळी शांतपणे बरसलेल्या पावसाने ग्रामीण भागात मात्र जोरदार तडाखा दिला, यात सावनेर, कळमेश्वर, कामठी आणि काटोल तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. विजांचे तांडव व वादळासह झालेल्या धुवाधार पावसाने शेत-शिवाराची धुळधाण केली. हातातोंडाशी आलेल्या कापूस, सोयाबीन, भाजीपाला पिकासह संत्रा, मोसंबीच्या बागांना जमीनदोस्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरले गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती आहे.
                      सकाळपासून सूर्याच्या तापानंतर दुपारी ४ वाजतापासून विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. सुसाट वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील पिके कोलमडून पडली. कळमेश्वर तालुक्यातील तिडंगी शिवारात मुसळधार पावसाने हाहाकारच माजवला, संत्र्यांच्या बाग उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे संपूर्ण कष्ट पाण्यात गेले.
                   अंदाजे तीन तास पर्यंत चाललेल्या या भयंकर धुंवाधार पावसाने कहर केला.  तिडंगीचे सरपंच रामभाऊ मारबते यांचेशी फोनवरून मिळालेल्या माहितीप्रमाणे तिडंगीला लागूनच असलेला कोलार तलाव हा 60 ते 65 सेंटिमीटर ने ओव्हर फ्लो होऊन ओसंडून वाहात आहे. यात महत्वाचे म्हणजे तलावाचा कंत्राट असलेल्या मच्छीद्रनाथ मच्छीमार संस्थेच्या 9 बोटी व अंदाजे 300 किलो मासे पकडण्याचे जाळे वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे संस्थेचे अंदाजे आठ ते दहा लाखाचे लाखाचे नुकसान झाले आहे.

खिंडसी जलाशय १०० टक्के भरले, ओव्हरफ्लो

                        रामटेक परिसरात सततच्या पावसामुळे खिंडसी जलाशय १०० टक्के भरला असून कधीही ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. जूनपासून २६ सप्टेंबरपर्यंत तहसील क्षेत्रात एकूण ९८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पेंच सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक झाडे आणि शाखा अभियंता अजय शेलारे यांनी सांगितले, जलाशय १०० टक्के क्षमतेपर्यंत (१०३ दलघमी) भरला आहे. आणखी पाऊस झाला आणि सुर व कपिला नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढेल, ज्यामुळे सुर नदीकाठावरील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कामठीत घरांचे छत उडाले, तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित

                        याशिवाय कामठी शहरासह तालुक्यातील काही भागांत दुपारी ४ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. पावसासोबतच गाराही पडल्या. वादळामुळे झाडे रोडवर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय, तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. किमान तासभर कोसळलेल्या पावसामुळे रोड व सखल भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. वादळामुळे घोरपड येथील नीलकंठ राऊत यांच्या घराचे छत उडाले व शेजारच्या समीर संतापे यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. आजनी-ड्रॅगन पॅलेस टेम्पल मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रोडला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. रोडवर झाडे पडल्याने कामठी-घोरपड मार्गावरील तसेच गादा रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली.

सावनेरच्या केळवदमध्ये मोठे नुकसान, सरसकट भरपाईची मागणी

                        दुसरीकडे सावनेर तालुक्यातील गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. माळेगाव, जोगा, नांदा, जैतपूर, छत्रापूर, खुरसापार, सावळी, जटामखोरा, रायबाचा, बिडगाव, रामपुरी, जलालखेडा, पंढरी, केळवद, हेटी, सालई, उमरी, तेलंगखेडी भागीमारी, नरसाळा, खापा (न) या गावांत थुवाधार पावसाने थैमान घातले.

केळवद सर्कलमधील विविध गावांतील पिके जमीनदोस्त झाल्याचे दृश्य.

                        हातात आलेले मोसंबी पीक पूर्णतः जमिनीवररून मोठ्या प्रमाणात गळती झाली. या भागातील मुख्य पीक असलेल्या कापसाचे तब्बल ७५ टक्के झाडे कोलमडली. कापसाची फुले व पाती जमिनीवर गळून मातीत मिसळली. काही शेतकऱ्यांचे गोठे शेतात असल्याने टिनपत्रे उडून गोठ्यांचेही नुकसान झाले. परिसरात वीज पुरवठाही खंडित झाला होता. या परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने सोयाबीन, कापूस, संत्रा व मोसंबी पिकाच्या नुकसानीची सरसकट भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News