December 1, 2025 6:26 am

महसुली तंटे आता गावामध्येच सुटणार : ग्रामसमित्यांचे गठण

ग्रामविकासाला दिशा : जिल्ह्यात ८४१ ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी सुरू

का टा वृत्तसेवा I
अमरावती / प्रतिनिधी : गावोगावी होणारे महसुली तंटे थेट ग्राम पातळीवरच सोडवून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी राज्य सरकारतर्फे महसूल तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत गावकऱ्यांच्या सहभागातून गावातील सर्व प्रकारचे महसुली तंटे सोडविण्याकरिता ८४१ ग्रामपंचायतींमध्ये अहिल्यादेवी होळकर तंटामुक्त समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी तंटामुक्त गावांना लाखोंच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
                         शेतीचे वाद, यातून उदभवणारे रस्त्याचे तंटे, धुरावाद आणि विविध प्रकारचे वाद वर्षानुवर्ष न्यायप्रविष्ट असतात. यातून वेळ आणि पैसा खर्च होत असताना मात्र यश मिळत नाही. परंतु, हे तंटे सामजस्साने मिटावेत. याकरिता महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेच्या धर्तीवर आता महसूल तंटामुक्त गाव ही योजना शासनाच्या वतीने राबविली जात आहे. याअंतर्गत गावस्तरावर ग्रामसभेतून तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हात महसूल विभागाने या अभियाला प्राधान्य देत महसुल तंटामुक्त गाव करण्याचा संकल्प केला आहे.
                         जिल्ह्यातील २०१७ गावांमधील महसुली तंटे सोडविण्या करिता ८४१ ग्रामपंचायतींमध्ये समित्यांचे गठण करण्यात आले आहे. इतकेच नव्हे या अभियाला प्रोत्साहन देण्याकरिता जिल्हास्तरावर तसेच तालुका स्तरावर महसूल तंटामुक्त असलेल्या ग्रामपंचायतींना लाखोंच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पहिल्या क्रमांकाच्या गावाला तब्बल ४० लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ३० लाख आणि तिसऱ्या क्रमांकाच्या गावाला २० लाख रुपये इतकी रोख पारितोषिके मिळणार आहेत. या निधीतून गावांचा विकास साधला जाणार आहे.
                         तंटामुक्त ग्रामविकासाची आजच्या समाजाला गरज न्यायालयीन खटले, खर्च व वेळेचा मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून, ग्रामीण समाजात ऐक्य व एकोपा वाढीस लागणार आहे. महसूल विभागाने हाती घेतलेले हे अभियान शेतकरी व ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरणार असून, यामुळे संपूर्ण ग्रामविकासाला नवी दिशा मिळेल. – आशिष येरेकर, जिल्हाधिकारी, अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News