December 1, 2025 5:51 am

कारंजा येथे कविसंमेलनाचे थाटात उद्घाटन

संतांच्या काव्यावर समाज उभा आहे — आमदार सुमित वानखेडे


कारंजा (घाडगे), दि. 25 ऑक्टोबर : “संत-महात्मे त्यांच्या अभंग आणि काव्यामधून सदैव परमेश्वराचे नामस्मरण करतात. ‘जे काही आहे ते तुझेच आहे, तेरा तुझको अर्पण क्या लागे है’ ही भावना जोपर्यंत मनात राहते, तोपर्यंत माणूस खऱ्या अर्थाने चांगला समाज उभा करू शकतो,” असे प्रतिपादन आमदार सुमित वानखेडे यांनी केले. ते कारंजा येथे आयोजित कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
                       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे अध्यक्ष प्रा. प्रदीप दाते होते. व्यासपीठावर प्रसिद्ध कवयित्री प्रा. विजया मारोतकर तसेच आयोजक विलास वानखडे उपस्थित होते.
                       कारंजा कला क्रीडा अकादमी, कारंजा (घाडगे) यांच्या वतीने बँक ऑफ इंडिया समोरील गार्डन परिसरात हे कविसंमेलन भव्यदिव्य पार पडले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी संगीता वाडकर व चमू यांनी स्तवन आणि स्वागतगीत सादर केले. अकादमीचे अध्यक्ष विलास वानखडे यांनी प्रास्ताविकातून पाहुण्यांचा परिचय करून दिला.
                       कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ, कवितासंग्रह आणि भारताचे संविधान भेट देऊन सत्कार करण्यात आला. आमदार सुमित वानखेडे यांचा सत्कार विलास वानखडे, प्रा. प्रदीप दाते यांचा सत्कार प्रेम महिले,
तर प्रा. विजया मारोतकर यांचा सत्कार प्रा. सारिका नासरे यांच्या हस्ते झाला.
                       कविसंमेलनाचा प्रारंभ ठाणेगाव येथील कवी सुरेश मलवे यांच्या “ना गाडी, ना घोडा, ना कार पाहिजे — आज माणसातला माणूस पाहिजे” या भावपूर्ण कवितेने झाला. यानंतर निलेश देशमुख यांनी “माय” कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
                       “पोरी जरा जपून” फेम कवयित्री प्रा. विजया मारोतकर यांनी “माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर”चा मोगरा फुलला हा काव्यमय कार्यक्रम सादर केला. यात एकच प्याला नाटकातील “तळीराम” ही भूमिका डॉ. माधव शोभणे, तर “कुसुमाग्रज” ही भूमिका गोविंद सालपे यांनी साकारली. राजेश माहूरकर यांनी सादर केलेल्या विनोदी कवितेने प्रेक्षकांना खळखळून हसवले.
                        लक्ष्मी डांगोरे (घोगरा) हिने “अजूनही उजळत आहे त्यांच्या मनातील सूर्य” या ओळींतून आयोजकांच्या कार्यावर प्रकाश टाकला, तर दिपाली बारंगे (एकांबा) हिने शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रभावी कविता सादर केली. चैताली चौधरी (एकार्जुंन) आणि कारंजाची चिमुकली आनंदी इंगळे यांनी “आई”वर हृदयस्पर्शी कविता सादर केल्या.
                         स्थानिक कवी प्रेमदास मोहोड, विनोद दंढारे, वासुदेव बारंगे, जयवंत नासरे, गोपाल विरुळकर, दुर्गा ढोबाळे, मनोज वानखेडे, रवींद्र कपुरे, सिद्धार्थ सोमकुंवर (हेटीकुंडी), प्रा. अरुण मानकर (आर्वी) यांनी सादर केलेल्या कवितांमुळे वातावरण हास्य आणि आनंदाने भरून गेले. सर्व कवींना भारताचे संविधान आणि कवितासंग्रह भेट देऊन गौरविण्यात आले.

                         या कविसंमेलनासाठी विशेष सहकार्य करणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रेमदास मोहोड, प्रा. डॉ. उमेश मेश्राम, बाबाराव सोमकुंवर, नगरसेवक राजेंद्र लाडके, विशाल इंगळे, रवींद्र कपुरे, अरविंद ढोबाळे, अशोक भांगे, गंगाधर यावले यांना पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, कवितासंग्रह आणि ग्रामगीता भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
                         अध्यक्ष प्रा. प्रदीप दाते यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, “निरपेक्ष साहित्यिक निर्माण झाला पाहिजे, त्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे.”
                         कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक विलास वानखडे यांनी स्वतःची श्वास गजल सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोमल चाफले व योगिता ठोंबरे यांनी उत्तमरीत्या केले. सूत्रसंचालनादरम्यान योगिता ठोंबरे यांनीही अनेक कविता सादर करून रंगत वाढवली. आभार प्रदर्शन कोमल चाफले यांनी केले.

• उद्घाटनप्रसंगी आमदार सुमित वानखेडे यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून संतकाव्याचे दाखले देत काव्याची महती सांगितली. राजकारणातही सुसंस्कृत साहित्यिक दडलेला असतो हे त्यांनी आपल्या काव्य सादरीकरणातून दाखवून दिले. त्यांच्या कवितेवर उपस्थित प्रेक्षकांनी “वन्स मोर” च्या आरोळ्या दिल्या.
•रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कविसंमेलनात प्रेक्षकांनी मनमुराद हास्याचा आणि काव्यरसाचा आस्वाद घेतला.
अनेकांनी व्यक्त केले — “आम्ही कित्येक वर्षांत एवढं हसलो नव्हतो!” आणि हीच ठरली या कविसंमेलनाच्या यशाची खरी पावती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News