February 7, 2026 8:37 am

पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग : लाखांदूर कडकडीत बंद

 संतप्त जनतेचा विराट मोर्चा, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

का टा वृत्तसेवा I प्रतिनिधी

लाखांदूर : शहरात पाच वर्षीय निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अमानवी अतिप्रसंगाच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला असून, या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी (१५ डिसेंबर) लाखांदूर अक्षरशः पेटून उठला. सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांच्या सहभागातून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर संतप्त जनतेने भव्य मोर्चा काढत आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

मोर्चाच्या सुरुवातीला शिवाजी टी-पॉइंट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, लाखांदूर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर शांततेत मोर्चा तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. अखेरीस, पीडित चिमुकलीस न्याय मिळावा यासाठी नागरिकांनी तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

नेमकी घटना काय?

प्राप्त माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी लाखांदूर शहरात अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीवर एका परप्रांतीय व्यक्तीने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. मात्र, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याची भावना व्यक्त करत नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

मोर्चातील ठळक मागण्या

मोर्चादरम्यान सादर करण्यात आलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत—

  • आरोपी व त्याच्या कुटुंबियांना लाखांदूर तालुक्यातून हाकलून देण्यात यावे

  • आरोपीविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा द्यावी

  • पीडित चिमुकली व तिच्या कुटुंबीयांना तात्काळ संरक्षण द्यावे

  • पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत व शासकीय नोकरी द्यावी

  • आरोपी व त्याच्या कुटुंबियांची आधार, रेशन व रहिवासी कागदपत्रांची सखोल चौकशी करून बेकायदेशीर कागदपत्रे रद्द करावीत

  • परप्रांतीयांच्या वास्तव्यासंदर्भात पोलीस पडताळणी सक्तीची करावी

  • शहरातील फुटपाथवरील अनधिकृत व्यवसायांची तपासणी करावी

सर्वधर्मीय ऐक्याचे दर्शन

या मोर्चात तालुक्यातील सर्व जाती-धर्मांचे नागरिक, विविध सामाजिक संघटना तसेच सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, शहरातील मुस्लिम संघटनांनीही या मोर्चाला जाहीर पाठिंबा देत स्वतंत्र निवेदन सादर केले.

मुस्लिम संघटनांची स्पष्ट भूमिका

जामा मशीद, अरबी मदरसा व कबरस्थान व्यवस्थापन समितीने निवेदनात म्हटले आहे की, पीडितेला तात्काळ व निष्पक्ष न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. समाजात भीती नव्हे, तर न्याय व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या घटनेनंतर लाखांदूरमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी जनतेतून होत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News