सनशाईन स्कूल, कारंजा येथे नववर्ष कॅलेंडरचे उत्साहात लोकार्पण
कारंजा (घा.) :
सनशाईन स्कूल, कारंजा येथे नववर्षाच्या निमित्ताने विशेष तयार करण्यात आलेल्या कॅलेंडरचे लोकार्पण दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. हे कॅलेंडर संस्था सचिव विजय ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण संस्थाध्यक्ष श्री. प्रेम महिले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना श्री. प्रेम महिले यांनी सांगितले की, “सनशाईन स्कूलचा प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यातील उज्ज्वल भारताचा शिल्पकार आहे. या विश्वासातूनच आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहोत. हे कॅलेंडर पाहताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात ‘मीही असे यश मिळवू शकतो’ हा आत्मविश्वास निर्माण व्हावा, हाच आमचा खरा उद्देश आहे.”
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व क्रीडा क्षेत्रातील यशाला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे तसेच इतर विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा, आत्मविश्वास व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करणे, हा या कॅलेंडरमागील मुख्य हेतू असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे कॅलेंडर केवळ दिनदर्शिका नसून विद्यार्थ्यांच्या मेहनतीची ओळख आणि यशस्वी वाटचालीचे प्रेरणास्थान ठरत आहे.
या कार्यक्रमाला नगर पंचायत कारंजा बांधकाम सभापती श्री. हेमंत बन्नगरे, पर्यवेक्षक श्री. पवन ठाकरे, ज्येष्ठ शिक्षिका सौ. संगीता चांगले, विभागप्रमुख सौ. ममता दिवाणे, सौ. शालिनी गोरे, सौ. पुष्पा एकापुरे, सौ. संगीता ढोले यांच्यासह समस्त शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
या नववर्ष कॅलेंडरमध्ये इयत्ता दहावीचे गुणवंत विद्यार्थी, विविध व्यावसायिक क्षेत्रात यश संपादन केलेले माजी विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, सायन्स ऑलिमपियाडमध्ये प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी तसेच विभागीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आहे.
कॅलेंडर प्रकाशनासाठी विरबा मार्ट, कारंजाचे संचालक श्री. दिनेश रायचुरा तसेच साई अंब्रोसिया कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक श्री. रमाकांत दळवी यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.