गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
कारंजा (घा.) / प्रतिनिधी :
गुरुकुल पब्लिक स्कूल, कारंजा येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक आशिष मानकर, पर्यवेक्षक वसंत बारंगे, शुभांगी पवार, सविता डहाके आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी पवार यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील खडतर प्रवास, समाजातील विरोधाला सामोरे जात मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग कसा खुला केला, यावर सविस्तर प्रकाश टाकला.
यानंतर पर्यवेक्षक वसंत बारंगे व सविता डहाके यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
जयंतीचे औचित्य साधून शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका स्पर्धा आदींचा समावेश होता. शाळेतील लहान विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतून “मी सावित्री बोलते” या विषयावर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल प्रभावी मांडणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका पद्मा काळे यांनी केले, तर त्रिवेना खवसे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.










