February 7, 2026 8:37 am

लाडक्या बहिणींचा संताप; मुंबई–कोलकाता महामार्ग रोखून भंडाऱ्यात आंदोलन

लाडक्या बहिणींचा संताप; मुंबई–कोलकाता महामार्ग रोखून भंडाऱ्यात आंदोलन

दोन महिन्यांचा हप्ता न मिळाल्याने महिलांचा सरकारविरोधात ठिय्या

भंडारा | प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते वर्ग करण्यात आल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्याचा उद्रेक शनिवारी ( 3 दिवसांपूर्वी) भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळाला.

संतप्त लाडक्या बहिणींनी भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करत महामार्ग अडवला. अचानक झालेल्या चक्काजाममुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अवजड वाहने, खासगी गाड्या तसेच प्रवासी वाहनांनाही याचा मोठा फटका बसला.

आंदोलन करणाऱ्या महिलांनी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे अद्याप खात्यात का जमा झाले नाहीत, असा थेट सवाल उपस्थित केला. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दोन महिन्यांचे मानधन एकाचवेळी दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अनेक महिलांना एकही हप्ता मिळालेला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तातडीने रक्कम जमा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही महिलांनी दिला.

दरम्यान, योजनेतील काही लाभार्थी महिलांची नावे यादीतून वगळली गेल्याचेही समोर आले आहे. तांत्रिक अडचणी, कागदपत्रांतील त्रुटी किंवा माहिती अपलोड करताना झालेल्या चुकांमुळे हप्ते अडकल्याचे सांगितले जात असले, तरी यामुळे महिलांचा संताप अधिकच वाढल्याचे चित्र दिसून आले. “योजना आमच्यासाठी आहे, मग प्रशासनाच्या चुका आम्ही का भोगायच्या?” असा सवाल आंदोलक महिलांनी केला.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस व प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधत संबंधित खात्याशी संपर्क करून तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील आणि लवकरच प्रलंबित रक्कम खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच यादीतून वगळल्या गेलेल्या नावांची पुन्हा पडताळणी केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

प्रशासनाच्या आश्वासनानंतर महिलांनी अखेर आंदोलन मागे घेतले. त्यानंतर काही वेळात महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. मात्र या आंदोलनामुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत राहिल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही वाहनचालकांनी प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली.

इतर जिल्ह्यांतही आंदोलनाची शक्यता

माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असली, तरी हप्त्यांच्या विलंबामुळे, यादीतील त्रुटींमुळे आणि तांत्रिक समस्यांमुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भंडाऱ्यातील घटनेनंतर राज्यातील इतर जिल्ह्यांतही असाच संताप उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व पात्र महिलांना त्यांचा हक्काचा मानधन वेळेत मिळेल यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून होत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News