e-KYC अपूर्ण राहिल्यास काळजी नको; लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची प्रत्यक्ष पडताळणी होणार – अदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची प्रत्यक्ष पडताळणी होणार

मुंबई | राज्य सरकारकडून वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी निकष कडक करण्यात येत असून, ई-केवायसी प्रक्रियेबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती.

मात्र, काही लाभार्थींनी ई-केवायसी करताना चुकून चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी महिलांची क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्यात येणार आहे. ही पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाईल, तसे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याच्या प्रतिक्रिया अनेक लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. विशेषतः मोबाईलवर ओटीपी न मिळाल्यामुळे वेळेत ई-केवायसी पूर्ण करता न आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या महिलांना दिलासा देण्यासाठी ई-केवायसीची मुदत आणखी काही दिवस वाढवून द्यावी, अशी मागणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News