सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; 

पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

पुणे : लोणीकंद परिसरातील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क येथे सासरच्या छळाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वैष्णवी लाटे असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी तिच्या पतीसह सासू, सासरे आणि दीर यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी लाटे हिचे लग्न यशवंत लाटे याच्याशी झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले; मात्र त्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. वारंवार शिवीगाळ, मारहाण आणि माहेरून पैसे आणण्यास भाग पाडणे यामुळे वैष्णवी मानसिक तणावाखाली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, पतीसह सासू, सासरे आणि दीर यांच्याकडून पैशांसाठी सातत्याने तगादा लावला जात होता. या त्रासामुळे वैष्णवी मानसिकदृष्ट्या खचली होती. अखेर या सततच्या छळाला कंटाळून तिने १४ मार्च रोजी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि दीर यांच्याविरुद्ध छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे विवाहित महिलांवरील कौटुंबिक छळ आणि हुंडाबळीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरातून केली जात आहे.

0
0

Leave a Reply

Realted News