गणिताचे उत्तर चुकल्याने विद्यार्थिनीला मारहाण;
शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : कुही तालुक्यातील देवडी कला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणिताचे उत्तर चुकल्याच्या कारणावरून एका विद्यार्थिनीला शिक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाइल्ड हेल्पलाईन (१०९८)च्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर वाडीभस्मे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० मार्च २०२६ रोजी देवडी कला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गात गणिताचा तास सुरू होता. यावेळी एका विद्यार्थिनीने प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने संतप्त झालेल्या शिक्षकाने तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत विद्यार्थिनीच्या हाताला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रकरण दडपण्याचा आरोप
घटनेची माहिती मिळताच चाइल्ड हेल्पलाईनच्या पथकाने पीडित विद्यार्थिनीच्या घरी भेट देऊन चौकशी केली. यावेळी विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, संबंधित शिक्षकांनी त्यांना शाळेत बोलावून कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. तसेच ही बाब बाहेर सांगितल्यास मुलीला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
या घटनेबाबत विद्यार्थिनीच्या वडिलांनी अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर चाइल्ड हेल्पलाईनच्या केस वर्कर मीनाक्षी धडाडे यांनी वेलतूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
कठोर कारवाईचा इशारा
विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देणे कायद्याने गुन्हा असून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. चौकशीत पालकांना धमकी दिल्याची बाबही समोर आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी दिली.
ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, चाइल्ड हेल्पलाईन पर्यवेक्षक अनिकेत भिवगडे आणि केस वर्कर मीनाक्षी धडाडे यांनी सहभाग घेतला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









