‘मूल चोरणारी’ समजून वृद्धेला जमावाकडून मारहाण

पाणी मागणे ठरले महागात; ‘मूल चोरणारी’ समजून वृद्धेला जमावाकडून मारहाण

पोलिसांच्या तत्परतेमुळे जीव वाचला, चौकशीत महिला निर्दोष

नागपूर : सोशल मीडियावर पसरत असलेल्या ‘लहान मुले पळवणाऱ्या टोळी’च्या अफवांमुळे नागपुरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी परिसरात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला मूल चोरणारी समजून जमावाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने महिलेचा जीव वाचला असून चौकशीत ती पूर्णपणे निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला औषध घेण्यासाठी रुग्णालयात गेली होती. औषध घेतल्यानंतर घरी परतत असताना त्यांना थकवा जाणवत असल्याने पाणी पिण्याची गरज भासली. त्यावेळी परिसरात खेळत असलेल्या एका लहान मुलाकडे त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. संबंधित महिला मूळ उत्तर भारतातील असल्याने त्या भोजपुरी भाषेत बोलत होत्या. मात्र स्थानिकांना त्यांची भाषा समजली नाही.

आरडाओरडीनंतर जमावाचा संताप

दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने अचानक आरडाओरडा करत ही महिला एका लहान मुलीला बॅगेत घालून पळवून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. हा आरोप ऐकताच परिसरातील काही नागरिक तेथे जमा झाले आणि कोणतीही खात्री न करता त्यांनी वृद्ध महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये जमावाकडून महिलेला मारहाण होत असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांच्या हस्तक्षेपाने सत्य समोर

घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वृद्ध महिलेला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि सुरक्षितपणे पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना संपर्क करून मुलगा व सुनेला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. चौकशीत ही महिला केवळ पाणी मागण्यासाठी थांबली होती आणि अपहरणाचा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट झाले.

अफवांवर विश्वास ठेवू नये – पोलिसांचे आवाहन

नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मूल पळवणाऱ्या टोळ्या’ सक्रिय असल्याच्या अफवा पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, मात्र कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News