नागपूरमध्ये सामाजिक समता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम
विज्ञानाधारित उद्घाटनाची अनोखी पद्धत
नागपूर — सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने १२ एप्रिल २०२६ रोजी काळे लेआऊट समिती, नारा (नागपूर) यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळी ७ ते १० या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. पारंपरिक तेल किंवा वात न वापरता केवळ पाण्याच्या सहाय्याने दिवा प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्सुकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाला काळे लेआऊट परिसरातील फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाटक आणि प्रबोधनाचा संगम
कार्यक्रमात अंनिस कार्यकर्ते गौतम पाटील आणि शोभा पाटील यांनी सादर केलेल्या एकपात्री नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. हसत-खेळत विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देण्यात आला.
तसेच “जोतिबांचा संघर्ष” हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकात रॉकी घुटके, माधुरी मेश्राम, श्वेता पाटील, आशुतोष टेंभुर्णे, अजय रहाटे, सुरेश सांगोळकर, देवानंद बडगे, माणिक लोणारे, चंदा मोटघरे आणि सर्वेरी बोरकर यांनी भूमिका साकारल्या.
विविध मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमात ॲड. विद्या खोब्रागडे यांनी “इंदिरा गांधी आणि विज्ञान” या विषयावर एकपात्री सादरीकरण केले. तसेच प्रा. पुष्पा घोडके, रमेश ढवळे, अशोक राऊत, विजय सालंकर, शीला डोंगरे आणि प्रज्ञा डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजप्रबोधनाचा संदेश
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशा प्रकारचे कार्यक्रम सर्वत्र आयोजित होत असून, सामाजिक समता आणि वैज्ञानिक विचारांचा प्रसार करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.










