अंनिस भंडारा शाखेचे पुनर्गठन; प्रा. वामन शेडमाके अध्यक्ष
भंडारा : प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) भंडारा शाखेचे पुनर्गठन नुकतेच करण्यात आले. या वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे व प्रधान सचिव डॉ. सुनील भगत केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. वामन शेडमाके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी प्रा. पुरुषोत्तम शहारे यांची निवड झाली.
इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष शंकर चेटूले, प्रधान सचिव मनोहर टिचकुळे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह विनोद बोधी, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प प्रमुख लिलाधर वासनिक, वार्तापत्र प्रकाशन कार्यवाह विरेंद्र गजभिये, महिला सहभाग कार्यवाह सुरेखा शेडमाके, विविध उपक्रम कार्यवाह वसंत सोमकुंवर, जातीअंत विभाग प्रमुख श्रीवंत तितरमारे, मुख्य सल्लागार राजकुमार बौद्ध आदींची निवड करण्यात आली.

सभेचे संचालन नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी केले, तर देवयानी भगत यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. प्रास्ताविक डॉ. सुनील भगत यांनी केले. अंनिसची उद्दिष्टे व कार्यपद्धती याबाबत रामभाऊ डोंगरे यांनी मार्गदर्शन केले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत नागपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वार्तापत्रे व माहितीपत्रके देऊन करण्यात आले. यावेळी प्रा. पुष्पा घोडके यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१ (अ) नुसार अंधश्रद्धा निर्मूलन हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे नमूद करत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. वामन शेडमाके यांनी आभार मानले. या प्रसंगी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.








