चोरट्यांनी एकाच रात्री तीन दुकाने फोडली : कळमेश्वर शहरातील घटना
का टा वृत्तसेवा I
नागपूर (कळमेश्वर) : चोरट्यांनी गुरुवारी (दि.१७) मध्यरात्री कळमेश्वर शहरातील तीन दुकाने फोडून रोख रक्कम चोरून नेली. चौथे दुकान फोडण्यात त्यांना यश आले नाही. या घटना शुक्रवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आल्या. ही चारही दुकाने शहरातील मुख्य बाजारात असून, हा भाग पहाटेपासून सतत गजबजलेला असतो. चोरीच्या वाढत्या घटना नागरिकांसाठी निश्चितपणे चिंतेचा विषय असून, पोलीसांना चोरटे सापडत नसल्याने, चोरट्यांमध्ये पोलीसांचा वचक कमी झाल्याची भावना शहरातील दुकानदारांसह नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
चोरट्यांनी कळमेश्वर शहरातील बाजार चौकात असलेल्या नगर परिषद कॉम्प्लेक्समधील परमात्मा एक बूट हाऊस या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ड्रावरमधील ५०० रुपये चोरून नेले. त्यांनी या दुकानाच्या बाजूला असलेल्या लक्ष्मीकांत डेली नीडस नामक दुकानाच्या शटर कुलूप तोडले आणि दुकानातून एक हजार रुपये लंपास केले. या दुकानाच्या बाजूला असलेल्या लक्ष्मीकांत डेअरी प्रॉडक्ट्स नामक दुकानाचे कुलूप तोडून आतून दोन हजार रुपये लंपास केले. या चोरट्यांनी पुढे न्यू धनगवळी किराणा ॲण्ड जनरल स्टोअर नामक दुकानाच्या शटरचे एक कुलूप तोडले. दुसरे कुलूप तोडण्याचा प्रयत्न असफल ठरला. त्यामुळे त्यांना या दुकानात चोरी करता आली नाही.

महिनाभरापूर्वी याच बाजार चौकातीलच गुलाब किराणा स्टोअर्स नामक दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सिगारेटची पाकिटे चोरून नेली होती. यावेळी चोरट्यांनी तिन्ही दुकानांमधून केवळ रोख रक्कम लंपास केली असून, साहित्याला हात लावला नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या चारही दुकानांची पाहणी करीत पंचनामा केला. या चारही घटनामध्ये पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ठोस सुगावा मिळाला नाही. त्यामुळे पोलिस या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी करीत आहेत.
महिनाभरापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांमुळे दुकानदार, व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा योग्य बंदोबस्त करून चोरीच्या घटनांना आळा घालावा आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे कळते.
मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
आमगाव-देवळी येथील घटना : हिंगणा पोलिसांची कारवाई
नागपूर (हिंगणा) : अलीकडे मंदिरेदेखील सुरक्षित राहिलेली नाहीत. आमगाव-देवळी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात असलेली दानपेटी व त्यातील रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणात हिंगणा पोलिसांनी दोन चोरट्यांना गुरुवारी (दि. १७) अटक केली. दोघेही देवळी-आमगाव येथील असल्याचे तसेच त्यांच्याकडून दानपेटीतील रक्कम जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीयूष हरिश्चंद्र कावळे (२४) व चेतन अंकुश कावळे (२१) दोघेही रा. देवळी आमगाव, ता. हिंगणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी चोरट्यांची नावे आहेत. आमगाव-देवळी येथे श्री संत गजानन महाराज मंदिर आहे. चोरट्याने त्या मंदिरातील दानपेटी चोरून नेली. पेटीत मंदिराला दानापोटी मिळालेली रक्कमदेखील होती. ही घटना बुधवारी (दि. १६) मध्यरात्री घडली आणि गुरुवारी (दि. १७) सकाळी उघडकीस आली. त्यामुळे मंदिराच्या विश्वस्तांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी दुपारी सावंगी (खाण), तसा. हिंगणा परिसरातून दोघांना शिताफीने ताब्यात घेत विचारपूस केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच त्यांच्याकडून ७०० रुपयांची लोखंडी दानपेटी आणि पेटीत असलेले २० हजार ३४८ रुपये रोख असा एकूण २१ हजार ४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार जितेंद्र बोबडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संतोष राठोड यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.