February 7, 2026 7:09 am

Karanja : महिला बचत गटांना व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन

सीईओंनी काजळी गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या
महिला बचत गटांना व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

कारंजा (घाडगे) | दि. १२ जानेवारी २०२६
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी बुधवार, ७ जानेवारी रोजी काजळी गावास भेट देऊन अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी संपूर्ण गावात फेरफटका मारत ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या विविध समस्या व गरजा जाणून घेतल्या.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात काजळी गाव उत्कृष्ट कामगिरी करत असून, ग्रामस्थ, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी सीईओंची भेट प्रेरणादायी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील धारपुरे, माजी उपसरपंच प्रवीण कोसे, गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना गृहप्रवेशाच्या चाव्या प्रदान केल्या. महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या गृहउद्योगांच्या खाद्यपदार्थ स्टॉलना भेट देत त्यांनी व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी सीआरपी गटाचे सदस्यही उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळेस दिलेल्या भेटीत सीईओंनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच शाळेतील परसबागेचे निरीक्षण करून प्रशंसा व्यक्त केली. अंगणवाडीला भेट देताना लहान मुलांच्या उपक्रमांविषयी समाधान व्यक्त करण्यात आले. शाळेतील विज्ञान प्रदर्शनातील प्रयोग पाहून उपस्थित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या काजळी ग्रामपंचायतीच्या नव्या वेबसाईटचे उद्घाटन सीईओ पराग सोमण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेबसाईटमुळे नागरिकांना विविध दाखल्यांसाठी अर्ज डाउनलोड करणे, कर ऑनलाइन भरणे, गावाची माहिती व ग्रामपंचायतीचा जमा-खर्च पाहणे तसेच तक्रारी ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायत अधिकारी रोशन धारपुरे यांनी इंटरॲक्टिव्ह बोर्डद्वारे वेबसाईटची सविस्तर माहिती दिली. यावेळी सीईओंनी वेबसाईटच्या पारदर्शकतेबद्दल समाधान व्यक्त केले.

यानंतर महिला बचत गटांमार्फत चालविण्यात येणाऱ्या गांडूळ खत व ट्रायकोडर्मा लॅबला भेट देऊन उत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत इमारतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत कमी गुणांक असलेल्या बाबींवर चर्चा करून सुधारणा कशी करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. काजळी गावाने स्पर्धेत अधिक गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी करावी, अशा शुभेच्छाही सीईओंनी दिल्या.

यावेळी थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या आरओ यंत्रणेचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका राई , सहाय्यक शिक्षक सुटे सर, अंगणवाडी सेविका टोपले व फरकाडे, महिला बचत गट, सीआरपी गट तसेच ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक लीलाधर डिग्रसे यांनी सहकार्य केले.

0
0

Leave a Reply

Realted News