(महाराष्ट्र) थोडक्यात महत्वाच्या बातम्या …

महाराष्ट्र : थोडक्यात महत्वाच्या बातम्या …

•  कोल्हापुरात आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

कोल्हापूर | 
कोल्हापूर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत मुख्याध्यापकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पीडित विद्यार्थिनी व तिच्या आईच्या तक्रारीनुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दोन वेळा हा प्रकार घडला. प्रकरणाची गंभीर दखल घेत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील करत आहेत. या घटनेमुळे गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासला गेला असून पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.


•  संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेदरम्यान फलटणचा जवान शहीद

सातारा | बरड (ता. फलटण) येथील भारतीय सैन्य दलातील जवान विकास विठ्ठल गावडे यांना आफ्रिकेतील दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. या दुःखद घटनेची माहिती मिळताच फलटण तालुका व त्यांच्या मूळगावी शोककळा पसरली आहे.

नायक पदावर कार्यरत असलेले विकास गावडे हे भारतीय सैन्याच्या ११५ इंजिनीयर रेजिमेंटमध्ये सेवा बजावत होते. ते २२ सप्टेंबर २०१६ रोजी सैन्यात दाखल झाले होते आणि पुणे येथे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती दक्षिण सुदान येथे संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत करण्यात आली होती.

जवान विकास गावडे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व दोन वर्षांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या वीरमरणाने संपूर्ण परिसरात शोकमग्न वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे पार्थिवावर रविवारी (ता. 11) रोजी सकाळी त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


•  राज्यात ८९.६५ कोटींची वीजचोरी उघड, १,२४२ ग्राहकांवर गुन्हे दाखल

नागपूर | 
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरात राबवलेल्या विशेष मोहिमेत ८९ कोटी ६५ लाख रुपयांची वीजचोरी व अनियमितता उघडकीस आणली आहे. या प्रकरणात ६,६८७ वीजचोरीची प्रकरणे निष्पन्न झाली असून, १,२४२ ग्राहकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत ६१ कोटी ९२ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

नागपूर विभागात एकट्या ३५ कोटी ९५ लाख रुपयांची वीजचोरी उघड झाली असून, ३०८ ग्राहकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तपासणीत २,२१४ ग्राहकांकडून थेट वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. विद्युत कायदा २००३ अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली असून, चोरी व अनधिकृत वापराच्या प्रकरणांत मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. वीजचोरी हा फक्त दंडनीय नव्हे तर फौजदारी गुन्हा असल्याचा स्पष्ट इशारा महावितरणने या कारवाईतून दिला आहे.


नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : उद्या सकाळी मतदान

नागपूर |
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, पोलिंग पार्ट्या ईव्हीएमसह मतदान केंद्रांकडे रवाना झाल्या आहेत. गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून शहरात मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे.

शहरातील ३८ प्रभागांमधून १५१ नगरसेवकांची निवड होणार असून, सुमारे २४ लाख ८३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी १६ हजार कर्मचारी व ५ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

शहरात ३,००४ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, त्यापैकी ३२१ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. महिला सहभाग वाढवण्यासाठी ‘पिंक बुथ’, तर प्रत्येक झोनमध्ये ‘आदर्श बुथ’ची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.


मुख्यमंत्र्यांनी बुलेट चालवत केला रोड-शो, बाईक रॅली

नागपूर :
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा मंगळवार, १३ रोजी सायंकाळी समारोप झाला. अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात भव्य रोड-शो आणि बाईक रॅली काढण्यात आली. भारतमाता चौकातून सुरू झालेला हा रोड-शो शहरातील प्रमुख चौकांतून फिरत गांधी गेट महाल येथे समाप्त झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बुलेट चालवून मतदारांशी संवाद साधला.

                       रोड-शोच्या मार्गावर भगव्या पताका, फुगे आणि पुष्पवृष्टीने उत्साहाचे वातावरण होते. फडणवीस यांनी कमळाला मतदान करण्याचे आवाहन करत महायुतीला सर्व महापालिकांत मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय भाजप नगरसेवक, नेते आणि उमेदवारांनी सभा, रॅली व महिला मेळाव्यांद्वारे प्रचाराची सांगता केली.


भाजप सत्तेसाठी खालच्या थराला गेलंय : वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टीका

म्हणाले-यंत्रणांचा गैरवापर थांबला तर ते कुठेच जिंकणार नाही

मुंबई I

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर तीव्र टीका केली. महापालिका निवडणुका, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ, रश्मी शुक्ला अहवाल आणि ध्रुवीकरणाचे राजकारण या मुद्द्यांवर त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच विजय होईल, असा ठाम दावा केला. मुंबई महापालिकेबाबत बोलताना भाजपला मुंबई ताब्यात घेऊन ती गुजरातच्या हितासाठी वापरायची असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप यंत्रणांचा गैरवापर करत असल्यानेच सत्तेत आहे, अन्यथा निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घेतली तर भाजप जिंकू शकणार नाही, असा दावा करत राज्यातील जनतेत सरकारविरोधात मोठी नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.


• ट्रकच्या धडकेमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

अमरावती :

मार्डी–अमरावती मार्गावरील तपोवन परिसरात सोमवारी सायंकाळी ट्रकच्या धडकेत २२ वर्षीय दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अक्षय प्रविणराव सोलव (रा. कविठा बुद्रूक, अचलपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

विद्यापीठाकडून मार्डीकडे जात असताना संत गाडगे बाबा कॉलनीजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने अक्षयच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


100 वर्षांच्या आजीचा मृत्यूच्या दारातून झाला पुनर्जन्म

रामटेक :
रामटेक शहरातील आंबेडकर वॉर्डात मृत समजून अंत्यविधीची तयारी करण्यात आलेल्या १०३ वर्षीय गंगाबाई सावजी साखरे या चमत्कारिकरित्या जिवंत आढळल्या. सोमवारी सायंकाळी त्यांच्या शरीरात हालचाल नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना मृत समजले होते आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती.

मात्र काही वेळाने नातू राकेश साखरे यांच्या लक्षात आजीच्या पायाच्या बोटांची हालचाल आली. तपासणीदरम्यान गंगाबाईंनी श्वास घेतल्याने त्या जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आणि अंत्यविधी रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे १३ जानेवारी रोजी गंगाबाईंचा वाढदिवस असून तो कुटुंबीयांनी आनंदात साजरा केला.


रेशन कार्डधारकांना दिलासा; प्रतिव्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ

अमरावती :
अमरावती जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या महिन्यापासून दरमहा प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ पुरवण्यात येणार असून, येत्या रविवारपासून रेशन दुकानांतून नव्या वितरणाला सुरुवात होणार आहे.

आतापर्यंत प्रतिव्यक्ती ४ किलो तांदूळ व १ किलो गहू दिला जात होता. नागरिकांच्या मागणीनुसार गव्हाचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यात सुमारे १९ लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, यासाठी १२,२४२ टन धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. या बदलामुळे तांदळाच्या चोरट्या विक्रीला आळा बसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


0
0

Leave a Reply

Realted News