September 10, 2025 5:25 am

MUMBAI : मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच…

मुंबईकर रोज अमराठींची गर्दी सहन करतो,

आता मराठी भाषिकांचा त्रास अभिमानाने सहन करेल – मनसे

मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबईतील रहदारीचा प्रश्न निर्माण झाला असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठा आंदोलकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आहे. मुंबईकर रोज अमराठी लोकांची गर्दी सहन करतो. आता मराठी भाषिकांचा त्रासही अभिमानाने सहन करेल, असे मनसेने या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.

                        मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांच्या समर्थनासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठी बांधवांचा मेळा मुंबईत जमला आहे. यामुळे राज्याच्या राजधानीतील रहदारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जरांगे व त्यांच्या समर्थकांना आझाद मैदान खाली करण्याचे आदेश दिलेत. तत्पूर्वी, मुंबई हायकोर्टाने मुंबईकरांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आंदोलकांना मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईतील सर्व रस्ते, पदपथ, रेल्वे व बसस्थानके मोकळी व स्वच्छ करण्याचे निर्देश दिले होते.

मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच आहे, राज ठाकरेंनी घेतली होती परखड भूमिका

                         या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मुंबईकर नागरीक मराठी भाषिक जनतेची गर्दी अभिमानाने सहन करेल असे ठणकावून सांगिले आहे. मुंबईकर रोज अमराठी लोकांची गर्दी सहन करतो. आता आपले हक्काचे मराठी भाषिक आले आहेत. तर त्यात वावगे काय आहे? थोडासा त्रास झाला तरी तो अभिमानाने सहन करू. आमचे राज ठाकरे नेहमीच सांगतात, मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे, असे अविनाश जाधव यांनी फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
                         उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांनी नुकतेच मनोज जरांगे पुन्हा मुंबईला का आले? या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात असे विधान केले होते. मराठा मोर्चा व आरक्षणाच्या मुद्यावर सर्व गोष्टींची उत्तरे एकनाथ शिंदेच देऊ शकतात. मनोज जरांगे परत का आले? याचेही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा मुंबईकरांना खूप त्रास होतोय, एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले? या प्रश्नांची सगळी उत्तरे एकनाथ शिंदे देतील, असे ते म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News