December 1, 2025 5:51 am

PSI Arrested : पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला तीन दिवसांची पोलिस कोठडी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी पोलिस उपनिरीक्षक शरण;

दुसरा संशयित आधीच पोलिस कोठडीत

फलटण (जि. सातारा) – २३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या तळहातावर दोन नावे लिहिली होती – एक उपनिरीक्षक गोपाळ, ज्याने तिच्यावर ४ वेळा बलात्कार केला आणि दुसरा प्रशांत, जो ५ महिन्यांपासून छळ करत होता. आता चार पानांची सुसाईड नोट देखील समोर आली आहे, ज्यामध्ये एका खासदार आणि त्यांच्या पीएवरही आरोप आहेत. या एका मृत्यूने संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
                       फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणात फरार असलेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा पोलिसांसमोर शरण आला. या प्रकरणातील दुसरा संशयित प्रशांत बनकर याला पोलिसांनी आधीच अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
                         मृत डॉक्टर फलटण येथील ज्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती, त्या घरमालकाचा मुलगा म्हणजेच प्रशांत बनकर आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर महिलेने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक बदनेने चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख केला होता. घटनेनंतर बदने फरार झाला होता, मात्र पोलिसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर तो शरण आला.
                         दरम्यान, या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या चौकशीची मागणी होत असून मृत डॉक्टरवर तिच्या मूळगावी वडवणी (जि. बीड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


“८०-९० पोस्टमॉर्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का?”

                         मृत डॉक्टरच्या बहिणीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मागील महिन्यात माझे तिच्याशी बोलणे झाले. ती म्हणाली, माझ्यावर पोस्टमॉर्टेम अहवालांबाबत दबाव येत आहे. अनफिट असतानाही फिट दाखवण्यासाठी सांगितले जात आहे. तिने नकार दिल्यानंतर तिच्यावर त्रास वाढला. आम्ही पाच पानांचे निवेदन दिले, पण काहीच निष्पन्न झाले नाही. ८० ते ९० पोस्टमॉर्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? ती आत्महत्या करूच शकत नाही,” असे तिचे म्हणणे आहे.

तपासासाठी वरिष्ठ अधिकारी फलटणमध्ये

                        या प्रकरणाचा तपास गतीने सुरू असून अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर फलटणमध्ये ठाण मांडून आहेत. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन तपासाचा आढावा घेतला.
                        डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी तळहातावर लिहिलेल्या मजकुरात प्रशांत बनकरवर मानसिक छळाचा आरोप केला होता. त्याला २४ ऑक्टोबर रोजी मित्राच्या फार्महाऊसवरून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याची २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

“फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा” — माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर

                         माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हटले की, “या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा करावी. त्या डॉक्टर भगिनीच्या मोबाईलचा सीडीआर तपासला पाहिजे, त्यातून अनेक सत्ये समोर येतील.”

“डॉक्टरला आलेल्या कॉलची चौकशी व्हावी” — रामराजे निंबाळकर

                          विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरला आलेल्या सर्व कॉलची सखोल चौकशी व्हावी.”

महिला आयपीएसच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याची मागणी

                         सातारा येथील जय भगवान प्रतिष्ठानने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाची महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून चौकशी व्हावी आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचीही चौकशी करावी. या निवेदनावर डॉ. प्रसाद ओंबासे, डॉ. रमाकांत साठे आदींच्या सह्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News