स्विगी डिलिव्हरी बाॅय चा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू
कळमेश्वर बोरगाव (उगले) येथील घटना
कळमेश्वर : ग्राहकाचे ऑर्डरवरून ‘स्विगी फुड पार्सल’ देण्यासाठी बोरगाव येथे आलेल्या डिलिव्हरी बाॅय चा पुलावरून वाहत्या पाण्यात वाहून बुडून मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे चार वाजता दरम्यान कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत बोरगाव येथे घडली.
मृतक कार्तिक शिवशंकर लाडसे, वय 18 वर्षे, राहणार ऊपरवाडी, गोविंदगड, कामठी रोड, कामठी असून तो बीएससीच्या प्रथम वर्षाला बी डब्ल्यू काॅलेज टेका नाका येथे शिकत होता. सोबतच् स्विगी फुड मध्ये डिलिव्हरी बाॅय चे काम करून तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. तसेच एअरफोर्स धरमपेठ नागपुर येथे एअरफोर्सचे ट्रेनिंग करित होता.
घटनेच्या रात्री तो आपले हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच 40 डीबी 6934 ने रात्री दरम्यान पार्सल पोहोचविण्यासाठी बोरगाव येथे गेला होता. परत येत असताना पुलावरून वाहत्या पाण्यात मोटरसायकल घसरून पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सकाळी मोटरसायकल, स्विगीची पार्सल बॅग व त्याचा मृतदेह पालथ्या अवस्थेत बोरगाव नदीत आढळून आला. त्याची सूचना गावकऱ्यांनी कळमेश्वर पोलिसांना दिल्यावरून पुढील कारवाई ठाणेदार मनोज काळबांडे यांचे मार्गदर्शनात सहा. पो. नि. देवेंद्र वंजारी करीत आहे.

स्विगी आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या समस्या अनेक असतात. खाली काही महत्त्वाच्या समस्या :
कमी उत्पन्न आणि कमिशन-एकूण कमाई हप्त्यांवर आणि बोनसवर अवलंबून असते. कंपन्या वेळोवेळी कमिशन कमी करतात, त्यामुळे उत्पन्नात घट होते. बर्याच वेळा जास्त तास काम करूनसुद्धा समाधानकारक पैसे मिळत नाहीत. अनेकजण दररोज 10-14 तास काम करतात. सुट्टी किंवा निश्चित वेळ नाही-डिमांड वाढली तर रात्रभर काम. सतत हवामानाशी संघर्ष जसे पाऊस, उष्णता, थंडी अशा सर्व हवामानात काम करावं लागतं. संरक्षणासाठी योग्य सुविधा किंवा इंशुरन्सची कमतरता.
सर्वात महत्वाचे वाहतुकीतील धोके, ज्यात अपघाताचा धोका सतत असतो. वेळेवर डिलिव्हरीसाठी घाई करावी लागते. हेल्मेट न घालणं किंवा विश्रांती न घेणं यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.
यावर ताण ग्राहकांकडून अनेक वेळा ग्राहक गैरवर्तन, उद्धटपणे बोलतात, चुकीच्या रेटिंग देतात. काही वेळा चुकीचे पत्ते, नकळत केलेले ऑर्डर कॅन्सल्स, यामुळे मनस्ताप व आर्थिक नुकसान होते. अॅप व टेक्नॉलॉजीच्या अडचणी वेगव्याच असतात. अॅप क्रॅश होणे, लोकेशन चुकीचे दाखवणे, किंवा बॅटरी संपणे, यामुळे डिलिव्हरी लेट होते.
आरोग्यविषयक समस्या नेहमी सामना करावा लागतो. सतत दुचाकीवर बसणं, अन्न वेळेवर न मिळणं, मानसिक तणाव यामुळे दीर्घकालीन आरोग्य बिघडते. वैद्यकीय विमा किंवा रुग्णसेवेचा अपुरा लाभ. स्थैर्याचा अभाव आणि अनौपचारिकता.
बहुतेक डिलिव्हरी बॉय ‘गिग वर्कर’ म्हणून ओळखले जातात, म्हणजेच त्यांना कोणतेही शासकीय संरक्षण नसते. नोकरदारासारखा हक्क नाही – पीएफ, सुट्टी, पगारवाढ यांचा अभाव.
स्विगी-झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय हे आधुनिक शहरांच्या सोयीसाठी झटणारे खरे “अनसंग हीरोज” आहेत. मात्र त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार, कंपन्या आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.










