त्यांचा बेदरकारपणा सनातनी संस्कृतीलाजबरदस्तचपराक : सुषमा अंधारे
पुणे : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन वर्षांपूर्वी चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून वारंवार भाष्य करत टीका केली होती. त्याचाच दाखला देत सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर करत भली मोठी पोस्ट लिहीत हल्लाबोल केला आहे.
सुषमा अंधारे त्यांच्या फेसबुक पोस्टवर लिहितात, मागे उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून भाजपमधल्या एक विचित्र बाई (चित्रा वाघ) आकांडतांडव करत होत्या. तेव्हाही मला जे वाटत होते तेच आताही अमृता फडणवीसांच्या चौपाटीवरच्या वेशभूषेवरून ट्रोल करणाऱ्या लोकांबद्दल वाटते. पक्षीय राजकारणापेक्षा बाई म्हणून आपली भूमिका जास्त महत्त्वाची नाही का? अमृता फडणवीस यांनी आपल्या व्यवसाय निवडीबद्दल किंवा वेशभूषा, केशभूषा एकूण राहणीमान याबद्दल दाखवलेला बेदरकारपणा हा इथल्या सनातनी संस्कृतीला लगावलेली जबरदस्त चपराक आहे.
पुढे सुषमा अंधारे लिहितात, सो कॉल्ड संस्कृती रक्षक अमृता फडणवीस यांच्या या बेदरकार वागण्याने पुरते जखमी झाले आहेत आणि त्यांचा विरोध सुद्धा अतिशय लूळापांगळा झाला आहे. मनोहर कुलकर्णी सारख्या माणसांचे तथाकथित संस्कृती रक्षणाबद्दलचे सगळे संकेत नुसते धुडकावलेच नाही तर मनोहर कुलकर्णींच्या वैचारिक अस्तित्वाच्या पार चिंध्या चिंध्या करून टाकल्या, असे अंधारे यांनी म्हटले आहे.
उर्फी जावेदच्या निमित्ताने लिहिलेली सुषमा अंधारेंची जुनी पोस्ट
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी उर्फी जावेदच्या निमित्ताने लिहिलेली जुनी पोस्ट पुन्हा एकदा पोस्ट केली आहे. ‘रिपोस्ट’ असे म्हणत सुषमा अंधारे यांनी त्यांची जुनी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले होते, मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटते. भारताच्या बाहेर गेल्या नंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट. पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटते तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकेच.
अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना (म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीस यांना) मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धीच्या झोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल, अशी जुनी पोस्ट सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शेअर केली आहे.