AHILYANAGAR – अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

अहिल्यादेवींच्या नावाने शेतकरी कर्जमाफी

8 ते 10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

अहिल्यानगर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी मोठी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली असून, येत्या 8 ते 10 दिवसांत कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांबाबत माहिती देताना शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख केला.

भरणे म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. येत्या दहा दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

अहिल्यादेवींचे कार्य आजही प्रेरणादायी

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना भरणे म्हणाले की, जलसंधारण, लोककल्याण आणि सुशासनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक ठरत आहे. जगातील महान स्त्रियांच्या इतिहासात अहिल्यादेवींचे नाव अग्रस्थानी राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

चौंडी परिसराच्या विकासासाठी 1300 कोटींचा आराखडा

चौंडी गाव आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे 1200 ते 1300 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पुढील दोन ते तीन वर्षांत या भागाचे चित्र पूर्णपणे बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धनगर समाजासाठी विशेष योजना

धनगर समाजातील युवक आणि मेंढपाळ बांधवांसाठी कृषी विभागामार्फत विशेष योजना आणण्याचे काम सुरू असल्याचेही भरणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार या योजनेवर काम सुरू असून, त्याचा लाभ समाजातील तरुणांना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(टीप : कर्जमाफीबाबतची घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केली असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) अथवा अंमलबजावणीची सविस्तर माहिती अद्याप प्रसिद्ध झालेली नाही.)

0
0

Leave a Reply

Realted News