तालुका वकील संघ कळमेश्वरचा अनोखा निषेध
एक दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवून, अत्यंत निंदनीय प्रकाराचा तीव्र निषेध
कळमेश्वर (का.टा. वृत्तसेवा) : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा. बी. आर. गवई यांच्यावर एका माथेफिरू वकिलाने न्यायालयीन परिसरात बूट फेकून मारल्याच्या अत्यंत निंदनीय प्रकाराचा तीव्र निषेध करत तालुका वकील संघ, कळमेश्वर यांनी एक दिवसाचे न्यायालयीन कामकाज बंद ठेवले.
या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली असून, सर्व स्तरांवरून या अमानवी कृतीचा निषेध व्यक्त केला जात आहे. कळमेश्वर तालुका वकील संघाने या पार्श्वभूमीवर दि. 7 ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कामकाज बंद ठेवून कळमेश्वरचे मुख्य न्यायाधीश, दिवाणी व फौजदारी न्यायालय यांना लेखी निवेदन देत निषेध नोंदवला.
संघाचे अध्यक्ष ॲड. हेमंत ताजने यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत दोषी माथेफिरू वकिलावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “न्यायसंस्था ही लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सर्वोच्च न्यायालयासारख्या पवित्र संस्थेत अशा प्रकारचे असभ्य वर्तन अमान्य आहे. न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठा आणि सन्मानाचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे.”
संघाचे सचिव ॲड. निलेश अंजनकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून ही माहिती दिली आहे.















Users Today : 2
Users Yesterday : 11