बाबा, मला व्यवसाय करायचा होता… लिहून ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
नीट परीक्षेत 1475 वा क्रमांक
चंद्रपूर : साडेपाच वर्षे शिक्षणासाठी लागणारा वेळ व ‘एमबीबीएस’ला लागणारा पैसा खर्च करण्यापेक्षा मला व्यवसाय करायचा होता, अशी सुसाइड नोट लिहून ‘एमबीबीएस’ला प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थ्याने घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी पहाटे नवरगाव येथे घडली. अनुराग अनिल बोरकर (२०) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याने कुटुंबासोबत शिक्षणासाठी गोरखपूरला जाण्यासाठी तयारीही केली होती.
अनुराग हा नवरगाव येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांचा मुलगा आहे. कुटुंबात आई-वडील आणि एक बहीण आहे. अभ्यासू अनुरागने ओबीसी कॅटेगरीतून नीट यूजी २०२५ या परीक्षेमध्ये १४७५ वा क्रमांक मिळवत ‘एमबीबीएस’मध्ये प्रवेश मिळवला होता. गोरखपूर येथे शिक्षणासाठी रवाना होण्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मंगळवारी सकाळी आईने अनुरागला उठवण्यासाठी दरवाजा ठोठावला मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.
खिडकीतून डोकावले असता तो खोलीत नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी त्याच्या खिशातून एक सुसाइड नोट मिळाली. त्यात ‘साडेपाच वर्षे वेळ आणि एमबीबीएस’ला लागणारा तेवढा पैसा खर्च करण्यापेक्षा मला व्यवसाय करायचा होता, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे लिहिले होते. अनुरागवर नवरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
![]()