कळमेश्वरमध्ये मालमत्ता कराच्या ४ ते ५ पट वाढीवर नागरिक संतप्त
‘कर आकारणीचे तातडीने पुनर्मूल्यांकन करा – अन्यथा तीव्र जनआंदोलन’
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिकेने २०२६-२०३० या कालावधीसाठी करण्यात आलेल्या फेरमूल्यांकनानुसार मालमत्ता करात झालेल्या मोठ्या वाढीविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नव्याने पाठविण्यात आलेल्या २०२६-२७ च्या कर आकारणी बिलांमध्ये अनेक ठिकाणी करात चार ते पाच पट वाढ झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, ही वाढ अन्यायकारक असल्याचे सांगत कर आकारणीचे पुनर्मूल्यांकन करून करवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष अविनाश माकोडे आणि मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

चार ते पाच पट करवाढ; नागरिक आर्थिक अडचणीत
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नव्या फेरमूल्यांकनामुळे मालमत्ता करात झालेली मोठी वाढ सर्वसामान्यांसाठी परवडणारी नाही. उद्योजक, व्यापारी, नोकरदार, शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर या करवाढीचा गंभीर परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
सर्वपक्षीय बैठक घेऊन पारदर्शक निर्णयाची मागणी
नागरिकांनी प्रशासनाकडे शहरातील लोकप्रतिनिधी, नागरिकांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून कर आकारणीबाबत पारदर्शक चर्चा करावी अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून वाजवी आणि न्याय्य कर आकारणी निश्चित करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मागण्या न मानल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा
करवाढ तातडीने रद्द करून पुनर्मूल्यांकन न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी प्रशासनाला निवेदनातून दिला आहे. या प्रश्नावर शहरातील विविध सामाजिक, व्यापारी आणि नागरिक संघटनांनीही एकजूट दाखविल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी विलास बारमासे यांचे नेत्रुत्वत शिष्टमंडळात विनोद जीवतोडे गुरुजी, राहुल हिवराळे, विलास बारमासे, राजू बोरकर, जमीर शेख, राजेश मुंदडा, मंगेश गमे, नगरसेवक सत्यवान मेश्राम, सुमेर भोसकर, राकेश देशमुख, निखिल चांदूरकर, चंद्रकांत लंगडे, प्रदीप कट्टयारमल, राजू आगलावे, नरेंद्र टाकळखेडे, बाल्या धरपाल, अनिल सातपुते, सचिन देशमुख, रशीद शेख, माणिक चांदूरकर, गंगाधर नागपुरे, हरीश हिंगणेकर, प्रवीण बोडखे, राजू पाटील यांच्यासह शहरातील अनेक मालमत्ता करधारक नागरिक उपस्थित होते.











