कारंजा शहरात रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न
का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
कारंजा (घा) प्रतिनिधी : कारंजा शहरात श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त श्रीराम नवमी उत्सव समिती व नितीनभाऊ दर्यापुरकर मित्र परिवार यांच्या वतीने भव्य व दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट नियोजन आणि युवा कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शोभायात्रेच्या प्रचार-प्रसारासाठी महिलांनी घरोघरी जाऊन संपर्क साधला होता. त्यामुळे यंदाच्या शोभायात्रेत महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. आकर्षक विद्युत रोषणाई, विविध देखावे (झाकी) आणि सजविलेले रथ यामुळे शोभायात्रा अधिकच उठावदार ठरली.
या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा प्रसंग होय. प्रभू श्रीरामांच्या झाकीसह असलेल्या रथाचे सारथ्य मुस्लिम बांधवांनी केले, ज्यामुळे बंधुभावाचा सुंदर संदेश समाजात पोहोचला.
शोभायात्रेची सुरुवात श्री गजानन महाराज देवस्थान येथून झाली. गोळीबार चौक व मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत जयस्तंभ चौक येथे महाआरतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. महाआरती प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी भक्तिमय वातावरणात महाआरतीत सहभागी होत महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्रीराम नवमी आयोजन समितीचे प्रमुख नितीनजी दर्यापूरकर यांनी सर्व सहकारी व सहभागी नागरिकांचे आभार मानले.











Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0