गुटखा माफियांवर मकोकाचा थेट घाव! तस्करांच्या मुसक्या आवळणार

गुटखा माफियांवर मकोकाचा थेट घाव!

तुकाराम मुंढेंचे कडक आदेश

किरकोळ विक्रेत्यांऐवजी आता मुख्य सूत्रधार आणि तस्करांच्या मुसक्या आवळणार

का टा वृत्तसेवा | मुंबई

                        महाराष्ट्रात गुटखा, तंबाखू आणि पानमसाल्याच्या अवैध व्यापारातून कोट्यवधींची कमाई करणाऱ्या गुटखा माफियांची आता खैर नाही. सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील गुटखा तस्कर, पुरवठादार आणि त्यांच्या आर्थिक पाठीराख्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आजपर्यंत कारवाईचा फटका प्रामुख्याने किरकोळ विक्रेते किंवा टपरीधारकांनाच बसत होता. मात्र, या अवैध धंद्यामागील खरे सूत्रधार, उत्पादक, वाहतूकदार, गोदाम मालक आणि वित्तपुरवठा करणाऱ्यांवर आता कायद्याचा कठोर बडगा उगारला जाणार आहे. पुराव्यांच्या आधारे संपूर्ण साखळीचा छडा लावून हे जाळे कायमचे उद्ध्वस्त करण्याचा निर्धार एफडीएने व्यक्त केला आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या १७ दिवसांत, म्हणजे २५ मे ते ११ जून या कालावधीत, एफडीएने ३ कोटी २७ लाख रुपयांचा अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य माल जप्त केला असून ३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही आकडेवारीच राज्यातील अवैध व्यापाराचे भीषण वास्तव अधोरेखित करते.

युवकांसाठी इशारा

गुटखा आणि तंबाखू हे केवळ व्यसन नाही, तर आयुष्य उद्ध्वस्त करणारे विष आहे. काही क्षणांच्या नशेसाठी हजारो तरुण स्वतःच्या आरोग्याचा, शिक्षणाचा आणि भविष्याचा सौदा करत आहेत. तोंडाचा कर्करोग, हृदयरोग आणि इतर गंभीर आजारांचे वाढते प्रमाण ही या व्यसनाची भयानक किंमत आहे. तरुणांनी अशा घातक पदार्थांपासून दूर राहून स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवावे, असा कडक संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.

गुन्हेगारांना स्पष्ट इशारा, तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना आता थेट जेलची वाट

तरुण पिढीच्या आरोग्यावर डल्ला मारून काळा पैसा कमावणाऱ्यांना आता कोणतीही दया दाखवली जाणार नाही. सार्वजनिक आरोग्याशी खेळणे हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजाविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे. मकोकासारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई झाल्यास दीर्घ कारावास, मालमत्ता जप्ती आणि संपूर्ण गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त होण्याचा धोका संबंधितांना पत्करावा लागणार आहे.

 

मकोकासाठी तीन प्रमुख निकष

  • गुन्हा दखलपात्र असावा आणि त्यासाठी किमान तीन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद असावी.
  • मागील दहा वर्षांत एकापेक्षा अधिक आरोपपत्रे दाखल झालेली असावीत.
  • दोन किंवा अधिक व्यक्तींनी संघटितपणे गुन्हा केलेला असावा.

दूध भेसळखोरांनाही इशारा

गुटखा माफियांबरोबरच दूध भेसळ करणाऱ्यांवरही एफडीएने कठोर भूमिका घेतली आहे. मुंबईतील डेअरी चालकांच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुधात पाणी किंवा रसायनांची भेसळ आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

“कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक व्यापाऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही; मात्र जनतेच्या आरोग्यावर नफा कमावणाऱ्या माफियांना आता कायद्याचा कठोर सामना करावाच लागेल,” असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.

 

 

0
0

Leave a Reply

Realted News