नवरी पळाल्यानंतर मेहुणीसोबत निकाह ठरवला
तिच्याबाबतची माहिती समोर येताच हाणामारी, तीन जखमी
बरेली (उत्तर प्रदेश) प्रतिनिधी : लग्नाआधीच नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन्ही कुटुंबांनी इज्जत वाचवण्यासाठी तिच्या धाकट्या बहिणीसोबत निकाह लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऐनवेळी धाकट्या बहिणीचेही प्रेमप्रकरण असल्याची माहिती समोर आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील बिथरी चैनपूर परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिथरी चैनपूरमधील एका गावातील तरुणीचा निकाह जवळील गावातील तरुणासोबत ठरला होता. शनिवारी नरियावल येथील एका हॉलमध्ये निकाहाची तयारी सुरू होती. दोन्ही कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या उत्साहात विवाहस्थळी जमले होते.
दरम्यान, शुक्रवारी रात्री नवरी घरातून बेपत्ता झाली. ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. घरातून जाताना तिने दागिनेही सोबत नेल्याची माहिती आहे. ही बाब नवरदेवाच्या कुटुंबाला समजताच लग्न मोडण्याची वेळ आली.
गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि नातेवाईकांनी मध्यस्थी करत अनेक तास पंचायत घेतली. चर्चेनंतर नवरीच्या धाकट्या बहिणीसोबत नवरदेवाचा निकाह लावण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून दोन्ही कुटुंबांची प्रतिष्ठा राखली जाईल.
शनिवारी ठरलेल्या वेळेनुसार वरात नरियावल येथील हॉलमध्ये पोहोचली. निकाहाची तयारी सुरू असतानाच नवरदेवाच्या कुटुंबीयांना धाकट्या बहिणीचेही एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची आणि तिलाही हे लग्न मान्य नसल्याची माहिती मिळाली. या माहितीने वातावरण तापले. दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वादावादी झाली आणि काही वेळातच वाद हाणामारीत परिवर्तित झाला. लाठ्या-काठ्या आणि दगडफेकीत विवाहस्थळी गोंधळ उडाला.
या घटनेत नवरीची चुलत बहीण, तिचा दीर आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गोंधळानंतर निकाह रद्द करण्यात आला आणि वरात नवरीविनाच परतली.
बिथरी चैनपूरचे एसओ राजेश मिश्रा यांनी सांगितले की, पहिली नवरी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर धाकट्या बहिणीसोबत निकाहाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र तिच्याबाबतही माहिती समोर आल्याने दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.





